- माधुरी पेठकर

'जास्त मोबाईल बघू नकोस' ' हे वय आहे का इन्स्टा रील करायचं?' ' सोशल मीडियावर पडीक राहण्यापेक्षा जरा अभ्यासाचं पुस्तक वाच' असं जेव्हा आई बाबा म्हणतात तेव्हा त्यांचा आपल्याला किती राग येतो! सारखं काय आमच्या 'प्रायव्हसी'मध्ये नाक खूपसतात असं वाटायला लागतं. आपण आई बाबांशी वाद घालतो. त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करुन मोबाइल वापरणं सुरुच ठेवतो.पण आता सरकारच मुलांच्या मोबाइल आणि सोशल मीडियाच्या वापराबाबत गंभीरपणे विचार करत आहे.
ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश आहे ज्याने आपल्या देशातील 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यास कायद्यानं बंदी घातली. काय आहे हा विषय? - चला, समजून घेऊया!
हेही वाचा!
आपल्याला श्वासच घेता आला नाही, तर? आपल्या सभोवतालची आणि घरातली हवा एवढी का खराब झाली?
ऑस्ट्रेलियात काय झालं?
- मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करुन ऑस्ट्रेलियन सरकारने 'ऑनलाइन सेफ्टी अमेडमेंट बिल २०२४ ' संमत केलं. सोशल मीडियावर अकाउंट असण्यासाठी १६ वर्ष वय अनिवार्य केलं गेलं. त्याखालील वयाच्या मुलांना सोशल मीडियावर प्रवेश देण्यास बंदी घालणारा कायदा केला गेला. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १० डिसेंबर २०२५ रोजी सुरु झाली.
- मुलं तासनतास सोशल मीडियावर असतात. तिथे त्यांच्या वयाला योग्य नसलेल्या हानिकारक गोष्टी बघतात. अशी मुलं अनेकदा सायबर बुलिंगची शिकार होतात,. सोशल मीडियाच्या अति वापरानं मुलांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडतं, मुलांमध्ये खाण्यापिण्याच्या विकृती निर्माण होतात... हे होऊ नये म्हणून ऑस्ट्रेलियाने हा कायदा केला आहे.
- या कायद्यानुसार इन्स्टाग्राम, फेसबुक, थ्रेड, एक्स, स्नॅपचॅट, किक, ट्विच, रेडिट, युट्यूब या सोशल मीडिया ॲप्सवर मुलं अकाउंट उघडू शकत नाहीत.
- युट्यूब किडस, गुगल क्लासरुम आणि व्हाॅटसअप हे प्लॅटफाॅर्म मात्र मुलं वापरु शकतात..
- मुलांनी हा कायदा न पाळला नाही, तर सरकार मुलांना किंवा त्यांच्या पालकांना शिक्षा करणार नाही. पण मुलांचा प्रवेश बंद करण्यासंदर्भात योग्य कारवाई केली नाही म्हणून सोशल मीडिया कंपन्यांना ५०0 मिलियन अमेरिकन डाॅलर्स एवढा मोठा आर्थिक दंड करणार आहे.

कायद्याचा परिणाम काय झाला?
- सरकारने जरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा केला असला तरी ऑस्ट्रेलियातली सर्वच मुलं या कायद्यामुळे आनंदी आहेत असं नाही. अनेक मुलांना सरकारचा खूप राग आला आहे. .
- रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करण्यासाठी अन पाहण्यासाठी काही नसल्यानं अनेक मुलांची झोप उडाली आहे.
- ऑस्ट्रेलियातल्या फक्त २० टक्के मुलांना सरकारची ही कृती योग्य वाटतेय.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान काय म्हणतात?
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲन्थनी अल्बानिस म्हणतात,' मुलं आमच्यावर नाराज झाली आहेत हे मला माहिती आहे. पण या निर्बंधाचा मुलांना फायदाच होणार आहे. मुलं हातातील फोन बाजूला ठेवून मैदानावर खेळायला जातील, पुस्तकं वाचतील. नवीन खेळ शिकतील, वाद्य वाजवायला शिकतील. नवनवीन मुलांशी ओळख करुन मैत्री वाढवतील. थोडा वेळ जाईल पण मुलांना याचे फायदे नक्की दिसतील!'
आता जगभरात काय होणार?
- डेन्मार्क आणि नाॅर्वे हे देश १५ वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार करत आहेत.
- फ्रेंच सरकारने अशा प्रकारच्या बंदीला मान्यता दिली आहे.
- भारतातही आंध्र प्रदेश राज्याने मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला आहे. काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


