खुर्चीवर बसण्याआधी खुर्चीला आलेल्या रागाची गोष्ट सांगणारी चेअरी टेल पाहा!

आज काय 'बघाल'?

- अर्चना भट

Image: .nfb.ca

तुम्हाला कधी, कोणी खुर्चीवर बसत असताना त्यांच्या खालून खुर्ची ओढून घ्यावीशी वाटलीये का? कोणी फजिती होऊन पडलं तर ज्यामच मज्जा येते ना! अर्थात असं केलं तर, नंतर ओरडा किती बसतो!! पण आता विचार करा, की कोणी बसत असताना, खुर्चीच स्वतःहून बाजूला झाली तर ?? आज आपण जी शॉर्टफिल्म बघणार आहोत, त्यात हे असंच होतं. या शॉर्टफिल्ममध्ये एक माणूस आहे. त्या माणसाला खुर्चीवर छानपैकी बसून पुस्तक वाचायचं आहे. खुर्चीला मात्र ते मान्य नाही. तिला अजिबात म्हणजे अजिबातच त्या माणसाला आपल्यावर बसू द्यायचं नाहीये. ती सारखी आपली इकडून तिकडे पळत राहते. बरं.. त्याने दुर्लक्ष केलेलं सुद्धा तिला मान्य नाही. ??

मग काय, धमाल सुरू ! कधी खुर्ची पुढे, तर माणूस मागे. कधी तो पुढे, तर ती पाठीमागे. कधी खुर्ची माणसाच्या वर, तर कधी खाली. कधी तर खुची चे चक्क त्याच्या डोक्यावर सुद्धा बसते. भरपूर वेळ प्रयत्न केल्यावर, माणसाला एक मस्त युक्ती सुचते आणि खुर्ची त्याला एकदाची आपल्यावर बसू देते ! ती युक्ती काय होती, हे तुम्हाला शॉर्टफिल्म बघितल्यावर कळेलच! कदाचित कधी, कोणी तुमचं ऐकत नसेल, तर तुम्हाला ती युक्ती वापरता सुद्धा येईल!

माणूस आणि खुर्ची अशी दोनच पात्र असलेल्या ह्या शॉर्टफिल्मचं नाव आहे, ‘चेअरी टेल (१९५७)’. ही बनवली आहे नॉर्मन मॅकलरेन आणि क्लॉड जुत्र ह्यांनी. दहा मिनिटांच्या ह्या शॉर्टफिल्ममध्ये पात्र एकमेकांशी एक अक्षरही न बोलता भरपूर धमाल करतात. ही शॉर्टफिल्म तुम्ही नक्की बघा.. फक्त बघायला बसाल, तेव्हा खुर्चीवर तेवढे बसू नका !
कुठे पाहायची? - गुगल करा chairy tale

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact