
विज्ञानाची उत्तरं लक्षातच राहात नाही. ती कशी पाठ केली म्हणजे लक्षात राहातील?
-विश्वजीत बसवेश्वर, सिध्देश्वर प्रशाला, सोलापूर
- विज्ञानासोबतच आपल्याला गणित, भूगोल, इतिहास, मराठी, हिंदी, इंग्रजी असे अनेक विषय अभ्यासायला असतात. प्रत्येक विषय हा वेगवेगळा असतो. प्रत्येक विषयाचं स्वरुप वेगवेगळं असतं. त्यामुळे सर्व विषयांचा अभ्यास करण्याची पध्दतही वेगवेगळी असते. काही विषयांना पाठांतर लागतं तर काही विषयांचा अभ्यास करताना पाठांतराशिवायही अनेक गोष्टी कराव्या लागतात.
- विषय इतिहास, भूगोल असो की विज्ञान केवळ पाठांतर करणं ही काही तो विषय लक्षात ठेवण्याची योग्य पध्दत नाही. विज्ञानाच्या अभ्यासाची तर मुळीच नाही.
- विज्ञानामध्ये कार्यकारणभाव, तर्क महत्त्वाचा. यासाठी विज्ञानाच्या संकल्पाना नुसत्या रेटून चालत नाही तर त्या नीट समजलेल्या असायला हव्यात. केवळ पाठांतर केल्याने त्या लक्षात राहात नाहीत.
- यासाठी विज्ञानाचा अभ्यास पध्दतशीर म्हणजे सिस्टेमॅटिकपणे करावा लागतो. जो धडा/ प्रकरण दुसऱ्या दिवशी शाळेत शिकवणार आहे तो तू आधी घरी एकदा नीट वाचलेला हवा. शिकवून झाल्यानंतरही तो पुन्हा वाचायला हवा. सर्व संकल्पना समजून घेण्यावर भर द्यायला हवा.
- जे अवघड वाटतंय त्याच्या तू नोट्स काढू शकतो. त्या त्या धड्यात जे जे प्रयोग किंवा शिक्षकांनी ज्या गोष्टी घरी करुन पाहायला सांगितलेल्या असतात त्या अवश्य कर. स्वत: प्रयोग केल्याने तुला पडलेल्या 'का' चे जे उत्तर मिळतं ते कायमस्वरुपी लक्षात राहातं.
- आकृत्या काढणे, तक्ते तयार करणे याचा उपयोग विज्ञानाची उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी होतो.
- अभ्यास करताना लक्ष पूर्ण एकाग्र कर. जे अवघड वाटतंय ते सोडून न देता शिक्षकांकडून वेळच्या वेळी समजून घे.
- विज्ञानामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते ते म्हणजे निरीक्षण . विज्ञानातल्या अनेक गोष्टी केवळ निरीक्षण केल्यानेही समजतात.
- वाचन-लेखन, निरीक्षण प्रयोग ही विज्ञानाचा अभ्यास करण्याची साधनं आहेत. ती बाजूला ठेवून केवळ पाठांतर केलं तर विज्ञान हा विषय कायम अवघडच वाटेल.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


