तुम्ही काय खेळता?

मी काय करु?

- गौरी पटवर्धन.

Image - Google.

सुट्टी लागली की सगळ्या मुलांचा पूर्ण दिवसाचा एकच उद्योग असतो, तो म्हणजे खेळणे! घरात, अंगणात, गल्लीत, बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये, मैदानात, रस्त्यात दिवसभर नुसती धमाल सुरु असते. आता हा सगळं दिवस खेळण्यासाठी तुम्ही कुठले कुठले खेळ वापरता बरं? त्यात आपण दोन गट करू.

एक म्हणजे बाहेरचे खेळ. “अरे घरात काय एवढा दंगा करताय? बाहेर जा बघू खेळायला!” असा घरातल्या मोठ्या माणसांचा आवाज आला, की तुम्ही कुठले खेळ उचलता बरं? क्रिकेटचं सामान, नुसता बॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, दोरीच्या उड्या (जी खरं तर उड्या मारायची दोरी असते, पण तिचं नाव ‘दोरीउडी’ असंच असतं.) वगैरे वगैरे.

जेव्हा मोठी माणसं या दोन पैकी एक वाक्य म्हणतात तेव्हा काय करता? “अरे उन्हाचे बाहेर खेळू नका. चला व्हा घरात.” किंवा “अंधार पडला, आता तरी खेळ संपतोय का नाही आजचा? एक मिनिटात घरात यायचं, समजलं का?”
त्यावेळी सुरू असलेला खेळ बंद करून सगळ्या मुलांना घरात जावंच लागतं. मग तिथून पुढे दुपारभर किंवा रात्री झोपायची वेळ होईपर्यंत तुम्ही काय खेळता? तर पत्ते, उनो, कॅरम, सापशिडी, ल्युडो, व्यापार किंवा तसाच एखादा बोर्ड गेम. यापलिकडे करण्याचे उद्योग म्हणजे चित्र काढणे, ती रंगवणे, कागद किंवा पुठ्ठयाच्या तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू बनवणे.

हे सगळं करणं तर भारीच असतं; पण या सगळ्यासाठी बाजारातून काही ना काही वस्तू विकत आणायला लागतात. त्यासाठी पैसे लागतात. त्यामुळे हे सगळं आपल्याला आईवडील दार वेळी आणून देतीलच असं नाही. मग आपण ज्याला पैसे लागत नाहीत असे काही खेळ स्वतःच बनवले तर?