रात्री मोबाईल बघण्याचा मेंदूला कंटाळा कसा येत नाही?

मेंदूची सिक्रेटस

- डॉ. श्रुती पानसे.

Image - Freepik

सूर्य मावळला की काही वेळाने आपल्याला नैसर्गिकरित्या झोप येऊ लागते. दिवसभर जे काही काम केलंय, जेवढे खेळ खेळलोय, अभ्यास केला आहे किंवा प्रवास केला आहे, तर या सगळ्यामुळे रात्री शांतपणे झोपणं हे शरीराला अतिशय आवडतं. नुसतं आवडत नाही तर आपण झोपणं ही शरीराची - विशेषतः मेंदूची खूप महत्त्वाची आणि मोठी गरज असते.

पण होतं काय की रोजच्या प्रमाणे सूर्य मावळतो. आपण घरी येतो, जेवतो. त्यानंतर काही वेळाने जांभया यायला हव्यात. पण नेमकं अशाच वेळेला मोबाईल हातात पडतो. इथे जो झगडा आहे आपल्या हातातला मोबाईल आणि मावळलेला सूर्य यांच्यामध्ये आहे. कारण सूर्य मावळला तेव्हा प्रत्येकाला असा संदेश देऊन गेला की आता संध्याकाळ झाली आहे. आता तुम्ही थकलेले आहात. रात्र झाली की झोपा. पहाटे उठा. पण मोबाईलमधून येणारा निळा प्रकाश आपल्याला असं सांगतो की ‘अजून तर दिवसच आहे.’ तो निळा प्रकाश आपल्याला झोपू देत नाही आणि म्हणून आपण झोप आलेली असूनसुद्धा झोपत नाही. त्या निळ्या प्रकाशामुळे झोप आपल्याला जाणवत नाही. ज्या वेळेला आपले डोळे खूप थकतात , खूप कंटाळा आलेला असतो, तरीही काही ना काही त्यावर बघतच राहतो. हा निळा प्रकाश आपल्याला फसवतो. त्याला आपल्याला फसवू द्यायचं नाही, तर सूर्याने आपल्याला जो संदेश दिलेला आहे की संध्याकाळच्या नंतर रात्र झाली की झोपायचं, तोच खरा मानायचा. त्याच्याचप्रमाणे वागायचं.