व्हॅन गॉ सारखं निसर्गाचं आणि स्वत:चं चित्र काढा!

चित्र-चित्रकार आणि तुम्ही

- आभा भागवत. 

Image - Google.


व्हॅन गॉ ने तेव्हाच्या काळी जशा चित्रांना मान्यता होती, तशी चित्रं न काढता स्वतःच्या खास शैलीत चित्रं काढली. त्यामुळे त्याच्या हयातीत फक्त एक चित्र विकलं गेलं. पण त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या चित्रांवर अजूनही जगभरातली माणसं खूप प्रेम करतात. आज आपण त्याची शैली समजून घेऊ आणि चित्र काढू. इथे व्हॅन गॉचं जे चित्र दिलेलं आहे, त्याचं नाव ‘स्टारी नाईट’. त्यातला आकाशाचा रंग, ताऱ्यांचा लखलखीत प्रकाश आणि वारा सुटल्यासारखे ब्रशचे फटकारे बघ. जणू काही त्या वाऱ्याने प्रत्येक ताऱ्याला मिठी मारली आहे आणि आख्खं आकाश जोडलं आहे. चंद्रकोर तर सूर्यासारखी पिवळी धम्मक आहे. तो सगळा दिपवून टाकणारा उजेड समोरच्या झाडांवर, घरावर पडलाय. ब्रशचा प्रत्येक फटकारा स्पष्ट दिसतोय. रंग कुठेच एकात एक मिसळत नाहीयेत.

आता चित्र काढण्यासाठी एक ए४ आकाराचा कागद आणि घरी असलेले कुठलेही रंग घे. तुला आवडणारे डोंगर, झाडं, आकाश, रात्र किंवा हवं ते निसर्गाचं चित्र काढ. व्हॅन गॉसारख्या वेगवेगळ्या रंगांच्या रेघारेघांनी चित्र रंगव. रंगवताना एखादा रंग खूप जास्त प्रमाणात चित्रात असावा का याचा विचार कर आणि त्याप्रमाणे वापर.

दुसरा एक कागद घे आणि आरशासमोर बसून स्वतःचं चित्र त्यावर काढ. मागच्या लेखाबरोबर व्हॅन गॉचं सेल्फ पोर्ट्रेट दिलं होतं तसं, पण स्वतःचं चित्र काढ. तुझ्या केसांचा रंग, डोळ्यांचा रंग आणि मुख्य म्हणजे आपला भारतीय माणसांचा त्वचेचा गडद रंग चित्रात येऊ दे. रेघा रेघांनी चित्र रंगवून पूर्ण कर. व्हॅन गॉची अजून चित्रं शोधून बघ.