खेळता खेळता दोन मुलांमध्ये युध्द सुरु होतं. ते कसलं?

आज काय बघाल?
- अर्चना भट

Image: filmcompanion

आज आपण जो लघुपट बघणार आहोत तो एक युद्धपट आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणामधलं युद्ध असेल? दोन देश? दोन राज्य? दोन विचारपद्धती? की दोन धर्म? उत्तर सांगू?- यातल्या कोणामधलंच नाही. हे युध्द या सगळ्याच्या पलिकडचं आहे. हे युद्ध आहे दोन लहान मुलांमधलं. खेळण्यांनी खेळलेलं. म्हणजे युद्ध-युद्ध खेळणारी मुलं नाही. ही आहेत आपापले खेळ खेळता खेळता अचानक युद्ध करायला लागलेली मुलं.

एक मुलगा आहे, मोठ्या बंगल्यात राहणारा आणि दुसरा बंगल्यासमोरच्या वस्तीत राहणारा. बंगल्यात राहणाऱ्या मुलाच्या घरी अर्धवट निघालेली सजावट आहे. कदाचित नुकताच त्याचा वाढदिवस होऊन गेलाय, म्हणूनच बहुदा त्याच्याकडे खेळणीच खेळणी आहेत. अगदी दुकानात असतता तितकी. तो त्यांच्याशीच खेळतोय. तसा कंटाळलेलाच आहे. त्याला बाहेरून आवाज येतो. खिडकीतून बघतो तर, समोरच्या वस्तीतला मुलगा त्याच्या घराबाहेर बासरी वाजवताना त्याला दिसतो. मग हासुद्धा येतो त्याची पिपाणी घेऊन. ते बघून वस्तीतला मुलगा ढोलकं आणतो. तर हा ढोलकं वाजवणाऱ्या माकडाचं किल्लीवरचं खेळणं आणतो. मग खिडकीखालच्या मुलाचं धनुष्य-बाण विरुद्ध आतल्या मुलाची तलवार, बंदूक, मशीनगन असं युद्ध रंगत. बंगल्यातल्या मुलाला आपण जिंकलोय असं वाटतच असतं, इतक्यात खालचा मुलगा पतंग आणतो.

आता पतंगा विरुद्ध बंगल्यातला मुलगा कोणतं खेळणं आणत असेल? कोण जिंकतं? की कोणीतरी जिंकून हरतं आणि हरून जिंकतं? या प्रश्नांची उत्तरं मिळवायला यूट्यूबवर जाऊन, सत्यजीत रेंचा 'टू'’ हा लघुपट नक्की बघा.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact