चपळ होण्यासाठी माकड्यासारख्या उड्या मारता यायला हव्यात!

Image: freepik

इकडे तिकडे उड्या मारायला, लोळायला, घरात समजा बेड, पलंग, सोफा अशा वस्तू असतील, तर खाली जमिनीवर पाय न ठेवता, पलंगावरुन बेडवर, बेडवरुन सोफ्यावर, सोफ्यावरुन खुर्ची किंवा टेबलवर.. दाराला किंवा कुठेतरी लटकत, उड्या मारत आणि चालत जाण्याचा प्रयोगही तुमच्यापैकी अनेकांनी केला असेल. कित्ती मज्जा येते ना त्यात?

पण आपल्या आईबाबांनी त्यात नक्कीच मोडता घातला असेल. ढुंगणावर सण्णकन एखादा रट्टाही ठेवला असेल.. असलेच काही उद्योग आपण शाळेतही नक्कीच करत असू आणि सगळ्यांकडून आपल्याला एकच ऐकावं लागत असेल ते म्हणजे, 'काय ‘माकडचाळे’ चालवलेत तुम्ही हे? नीट माणसासारखं बसता येत नाही का?'

पण तुम्हाला सांगू? या माकडचाळ्यांत किती मज्जा आहे, हे या मोठ्यांना कोण सांगणार? खरं तर असे माकडचाळे त्यांनी स्वत:ही त्यांच्या लहानपणी केले असतील. पण विसरले असावेत आता सगळे.. हो, पण उड्या मारत आपल्या वस्तू, घर, शाळा खराब करणं चूकच.

हेही वाचा!

माकड कसं उड्या मारतं, एका फांदीवरुन दुसऱ्या फांदीवर कसं लटकतं, इकडून तिकडे उड्या मारत पळतं, हे त्याचे ‘माकडचाळे’ म्हणजे एक अतिशय उत्तम असा व्यायामप्रकार आहे. मार्शल आर्टमध्येही याचा वापर केला जातो. हा व्यायाम खूप वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतो आणि त्यातली डिफिकल्टी लेवलही आपल्या सोयीनुसार आणि आपल्याला झेपेल तशी वाढवता, कमी करता येते.

माकड उड्या कशा माराल?

१. हा हालचालींचा एक प्रकार आहे. त्यातल्या त्यात सोपा प्रकार करु. गुडघे, हात, मुठी आणि पाय यांचा मुख्यत्वे वापर यात करायचा आहे.

२. उकडिवे बसा. हातांच्या मुठी वळा.

३. अंग एकमद सैल सोडा. हातांच्या मुठी जमिनीवर टेकवा.

४. शक्यतो सपाट, खाली खडे, दगड, गोटे नसतील अशी जागा निवडा. आपल्या हातांच्या मुठी जमिनीवर ठेवा.

५. आता मुठींवर वजन देऊन आपलं शरीर उचला, एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, एकदा समोर अशा जमतील तितक्या उड्या मारा.

Image: friso.com

माकड उड्यांचा फायदा काय?

१. यामुळे हातापायांत ताकद येईल.

२. आपली लोअर बॉडी स्ट्रॉँग होईल.

३. शरीराची लवचिकता वाढेल.

४. तुम्ही अधिक सतर्क आणि चपळ व्हाल.

पाहाच करून हे माकडचाळे आणि दाखवा आपल्या आईबाबांनाही की या माकडचाळ्यांमुळे तुमच्यात किती ताकद आली ते!

- ऊर्जा

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact