संपूर्ण शरीराचा व्यायाम करण्यासाठी चाला बदकासारखं!

Image: onlineresize

बदक हा पक्षी आपल्या सगळ्यांना माहीत आहे. बऱ्याच लहानमोठ्या पाणवठ्यांच्या ठिकाणी हा आपल्याला सहज दिसतो. कसा असतो तो? कसा दिसतो? चालतो? बदकाचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल, तो शरीरानं तसा स्थूल असतो. त्याची मान आणि पाय आखूड असतात. त्याला फार जोरानं पळता येत नाही. त्याचे पायही फताडे असतात. या फताड्या आणि फेंगड्या पायांनीच तो डुलत डुलत चालतो. चालताना क्वॅकऽऽ क्वॅकऽऽऽ आवाज करत जातो.

दिसायला हा पक्षी जरा स्थूल असला, हळूहळू चालत असला, तरी त्याचा व्यायाम मात्र जबरदस्त असतो. म्हणजे तो जसा चालतो, तसं चालून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, या व्यायामात किती दम आहे ते!

या व्यायामाचं नाव आहे ‘डक वॉक’ अर्थात बदकाची चाल!

खरं तर हा व्यायाम प्रकार म्हणजे एक प्रकारचे स्क्वॉट्सच आहेत. पण या व्यायामानं फक्त पायांचाच नाही, इतरही अनेक प्रकारचा उत्तम व्यायाम आपल्या शरीराला घडतो.

हेही वाचा!

कशी चालायची बदकाची चाल?

१. आपले गुडघे वाकवा आणि पायाच्या तळव्यांवर शरीराचा भार घ्या.

२. शक्य तितकं खाली झुका. फार नको. नाहीतर पाठ दुखेल.

३. आपल्या पायांवर म्हणजे गुडघे दुमडून त्या स्थितीत पूर्णपणे खाली बसू नका.

४. साधारणपणे खुर्चीवर बसताना आपली जी स्थिती असते, त्याच्या थोडं खाली येईल इतके गुडघे वाकवा.

५. आता एका वेळी एक पाय, अशा पद्धतीनं बदकासारखंच त्याच्या फेंगड्या आणि फताड्या चालीनं चाला.

Image: onlineresize

डक वाॅकमुळे काय होईल?

१. आपल्या लोअर बॉडीचा अतिशय उत्तम व्यायाम यामुळे होईल.

२. अनेक प्रकारचे खेळ, शर्यती, मार्शल आर्टसाठी, तसंच वॉर्मअपसाठी हा व्यायामप्रकार महत्त्वाचा मानला जातो.

३. पायांची ताकद यामुळे वाढते.

४. शरीर लवचिक होते.

५. शरीरात चापल्य येते.

६. ढुंगण आणि त्याच्या आजूबाजूच्या स्रायूंमधली ताकद वाढते.

७. कोणताही खेळ खेळताना त्याचा उपयोग होतो.

हा व्यायाम आणखी अचूकपणे करायचा असेल, तर बदकाची चाल प्रत्यक्ष, नाहीतर यूट्यूब व्हीडीओवर नक्की बघा.

-ऊर्जा

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact