पाहा बैल आणि मुलाच्या नात्याची गोष्ट सांगणारा टिंग्या चित्रपट

आज काय 'बघाल'?

- अर्चना भट

आज आपण टिंग्या नावाचा सिनेमा बघू. ही गोष्ट आहे एका टिंग्या नावच्या मुलाची आणि त्याच्या बैलाची. टिंग्या महाराष्ट्रातल्या एका गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. घरी त्याचे आई, बाबा, भाऊ आणि तो असे चौघं राहतात. त्यांच्याकडे दोन बैल आहेत. एक चितंग्या आणि दूसरा पतंग्या. पतंग्या भावाचा लाडका तर चितंग्या टिंग्याचा. चितंग्याशिवाय त्याचं पानच हलत नसतं. एकदा काय होतं, चितंग्या शेत नांगरत असताना एकाएकी थांबतो. आणि जमिनीवर बसकण मरतो. काही केलं तरी उठत नाही आणि चालत तर मुळीच नाही. सगळे खूप प्रयत्न करून बघतात पण काहीच उपयोग होत नाही

ऐन नांगरणीचे दिवस असल्याने दुसऱ्या कोणाचा बैल कामासाठी मिळू शकत नाही. त्यामुळे शेवटी नाइलाजाने आई आणि बाबा, चितंग्याला विकून नवा बैल घ्यायचं ठरवतात. चितंग्याला काम तर करता येत नसतं,त्यामुळे त्याला खाटकाला विकायचं असं ठरतं. हे ऐकून टिंग्याला खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं. तो रडून नुसता गोंधळ घालतो.

चितंग्या जाऊ नये म्हणून तो खूप काय काय करतो. त्याचं आणि चितंग्याचं काय होतं हे तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा कळेलच. ह्या सुंदर सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, मंगेश हडवळे. सिनेमामध्ये टिंग्याचं काम शरद गोएकरने इतकं छान केलंय की आपल्यालासुद्धा चितंग्यासाठी वाईट वाटायला लागतं. हा सिनेमा zee5 ॲपवर मोफत उपलब्ध आहे. फक्त त्यासाठी zee5 वर लॉगिन करावं लागेल. सिनेमा नक्की बघा!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact