
Image: news.cgtn
खोल खोल समुद्रात काय असतं? तिथे कोणते प्राणी आणि वनस्पती असतात याबाबत प्रत्येकालाच कुतुहल असतं. खोल समुद्रात अनेक गूढ, चमत्कारिक वाटणाऱ्या गोष्टी असतात. खोल समुद्रात असाच एक गूढ मासा राहातो. अर्थात तो एकटा नसतो. त्याच्यासारखे भरपूर मासे असतात. पण हे मासे साधे सुधे नसतात. त्यांचं दिसणं, त्यांचं वागणं सगळंच विचित्र. या माशांचं नाव आहे ॲंगलर फिश. हे मासे जगातल्या सर्व समुद्रात आढळत असले तरी प्रामुख्याने अटलांटिक आणि अंटार्टिक समुद्रात आढळतात. हे मासे म्हणजे खोल समुद्रातील मोठं आकर्षण आहे. एकतर ते दिसायला वेगळे असतात. शिवाय त्यांची शिकार करण्याची पध्दतही विचित्र असते. त्यांचं तोंड मोठं असतं. आणि डोक्यावर मागे पुढे हलणारा एक मांसल भाग असतो. या दोन गोष्टींमुळेच नाही तर इतर गोष्टींमुळेही हा मासा विचित्र ठरतो.
ॲंगलर फिश हे नाव ऐकायला वेगळं वाटतं ना.. हे नाव पडलं आहे या माशांच्या शिकार करण्याच्या पध्दतीवरुन. या माशांच्या डोक्यावर अँटिनासारखी एक काटेरी काडी असते. . त्या काडीच्या टोकावर मांसल भाग असतो. हा भाग चमकतो. ॲंगलर माशाच्या डोक्यावरील या चमकणाऱ्या भागाकडे आकर्षित होवून त्याचे सावज जवळ येतात आणि हा मासा शिकार करतो. माणसं मासे गळाला लावतात तसा हा मासा आपली शिकार अशी गळाला लावून फस्त करतो. या मांसल भागात बायोल्युमिनिसेंट नावाचा जिवाणू असतो. हा जिवाणूही सावजाला आकर्षित करतो
हेही वाचा!
हा मासा मोठा चमत्कारिक. त्याच्या आकरापेक्षा दुप्पट आकाराचं सावजही तो गिळू शकतो. आणि त्याचं पोटही त्याला तशी परवानगी देतं. म्हणजे हा मासा काय खातो, त्याप्रमाणे त्याचं पोट मोठं होतं. या माशाच्या तोंडात अणुकूचिदार, पारदर्शक दात असतात. त्याचा उपयोग करुन तो कठीण कवचाचे जलचर प्राणी खातो त्याचे तुकडे करतो. या माशाच्या पोटात त्याच्या डोक्यावर असलेला बायोल्युमिनिसेंट नावाचा जिवाणू असतो, हा जिवाणू मासा जे खातो , त्याचे बारीक बारीक तुकडे करुन त्याचं पचन करण्याचं काम करतो. तसेच या जिवाणुच्या सहाय्याने या मासा प्रकाश निर्माण करतो. त्यामुळे अंधारातला रस्ता तर त्याला दिसतोच शिवाय इतर प्राण्यांना आपल्याकडे आकर्षित करुन घेतो. ॲंगलर माशाची प्रचनशक्ती फारच मंद असते. त्यामुळे एकदा खाल्लं की पुढे अनेक आठवडे काय खायचं हा त्याच्यापुढे प्रश्न नसतो. कधी कधी तर या माशाला महिनाभरही भूक लागत नाही.

Image: reddit

Image : news.cgtn
काही ॲंगलर माशांच्या प्रजाती खोल समुद्रात १००० मीटरपेक्षाही जास्त खाली म्हणजे १५०० मीटर खोल भागात आढळतात. इथलं वातावरण एकदम थंड, समुद्राच्या पाण्याचा प्रचंड दाब आणि काळोख अशी डेंजर परिस्थिती असतानाही हे मासे खोल समुद्रात व्यवस्थित राहातात. या ॲंगलर माशांच्या २०० प्रजाती असतात. प्रत्येक प्रजातीच्या माशाची स्वतंत्र वैशिष्ट्यं असतात.
ॲंगलर माशाच्या शरीरावरची त्वचाही वैशिष्ट्यपूर्ण असते. ही त्वचा रुप बदलते. त्यामुळे हा मासा कधी कधी अदृश्यही होतो. शिकाऱ्यापासून लपण्याच्या आणि शिकार करण्याच्या या माशाच्या विशिष्ट पध्दतीवरुनच खोल समुद्रातल्या या माशाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact