कोणालाच माहिती पडणार नाही अशा तिघा मित्रांच्या एका ‘ढाक’ची गोष्ट

 

image : freepik

“आपण ना इथेच आपली ढाक बनवूया.” सोसायटीच्या आवारातल्या मोठ्या आंब्याच्या झाडापाशी उभं राहून आद्य म्हणाला. “ढाक म्हणजे?” झेलमने शब्दच पहिल्यांदा ऐकला होता.

“अगं ढाक म्हणजे आपली लपायची जागा.” आद्यने रुबाबात माहिती पुरवली. त्यानेही तो शब्द कालच शाळेत नव्याने ऐकला होता, आणि त्याला तो फार आवडला होता. त्यामुळे त्याने कसं मलाच तुझ्यापेक्षा जास्त माहिती असतं अशा थाटात झेलमला ग्यान दिलं खरं, पण झेलमने लगेच त्याचा पोपट केला. ती म्हणाली,

“पण इथे कुठे लपायला जागा आहे?”

त्याच्या पाठोपाठ अवनीपण त्याची अक्कल काढल्याच्या सुरात म्हणाली, “आणि आपण कशाला लपायचं?”

“अगं तसं नाही…” त्या दोघींनी त्याच्या शब्दाची टिंगल केल्यामुळे तो जरा इरिटेट झाला होता. “ढाक म्हणजे आपली रोजची भेटायची जागा. म्हणजे ही जागा जर आपली ढाक असेल तर आपण इथे दुसऱ्या कोणाला येऊ द्यायचं नाही. आपल्या सगळ्या सीक्रेट मीटिंग्ज इथे करायच्या. आणि समजा लपून बसायला लागलं, तर या झाडावर चढून लपायचं…” झाडावर लपायची आयडिया त्यालाही ऐनवेळी सुचली होती. पण त्याने ते तसं दाखवलं नाही.

आता अवनी आणि झेलम जरा इंटरेस्टने बघायला लागल्या. मग आद्यने आपला मुद्दा अजून पुढे रेटला. तो म्हणाला, “शिवाय आपण जर झाडाच्या फांद्यांमध्येच ढाक केली तर ती कोणाला सापडणार नाही. आणि आपल्या ढाकीत कोणीच येऊ शकणार नाही.”

हेही वाचा!

आधी भांडण मग मैत्री. रेनकोट आणि छत्रीची मैत्री कशी झाली?

image : housing

ही आयडिया मात्र अवनी आणि झेलमला आवडली. त्यांना अशाच एका ढाकीची सॉलिड गरज होती. कारण आत्ताच, फक्त पाच मिनिटांपूर्वी त्यांना सोसायटीतल्या मोठ्या मुलांनी त्यांच्या गॅंगमधून हुसकून दिलं होतं. म्हणजे ती मुलं होती बारा तेरा वर्षांची. आणि हे तिघं होते नऊ-साडेनऊ वर्षांचे. एरवी ती मोठी मुलं या तिघांना खेळतांना फिल्डिंग करायला, गणपतीच्या डेकोरेशनमध्ये झिरमिळ्या लावायला अशी बरोबर येऊ द्यायची. पण आज मात्र त्यांनी या तिघांना चक्क हाकलून दिलं होतं. त्यांचा टीनएजर्स ग्रूप होता म्हणे!

इतकी वर्षं त्याच ताईदादांच्या मागे सतत शेपटासारखं फिरणाऱ्या या तिघांना अचानक “तुमचं तुम्ही काहीपण खेळा” म्हंटल्यावर काही सुचेनासं झालं होतं.

पण आपली आपली एक ढाक करण्यापासून खेळाची सुरुवात करायची आयडिया त्यांना आवडली होती.

आद्य, झेलम आणि अवनीने सोसायटीतलं मोठं आंब्याचं झाड ‘आपली ढाक’ म्हणून डिक्लेअर तर केलं. पण तिथे बसून करायचं काय ते मात्र कोणालाच सुचेना. शेवटी झेलम म्हणाली,

“आपण आधी झाडावर चढू आणि आपली ढाक आतून कशी आहे ते बघू.” असं म्हणत तिने पायातले फ्लोटर्स काढले, झाडाच्या पारावर चढून उभी राहिली आणि झाडावर चढायला सुरुवात केली. खरं म्हणजे त्या तिघांनाही झाडावर चढता येत नव्हतं. ते कधीच कुठल्याच झाडावर चढलेले नव्हते. पण झेलमने वर बघितलं आणि तिच्या लक्षात आलं, की या झाडावर चढणं अगदीच सोपं होतं. एक तर फांदी सहज तिच्या हाताला लागत होती. दुसरं म्हणजे झाडाच्या खोडावर छोट्या गाठी होत्या आणि खोडं एकूणच खडबडीत होतं, त्यामुळे हाताने फांदी धरून खोडावर पाय टेकून सहज वर जाता आलं असतं. तिने थोडा प्रयत्न केला आणि ती पहिल्या फटक्यात फांदीवर जाऊन बसली. तिच्याकडे बघून मग आद्य आणि झेलमची पण थोडी हिम्मत वाढली. तेही दोघं तसेच वरच्या फांदीवर आले.

image : freepik

ते झाड बरंच जुनं असावं. कारण त्याचा पसाराही खूप मोठा होता आणि फांद्या चांगल्या रुंद होत्या. हळू हळू हिम्मत करून इकडच्या तिकडच्या फांद्यांवर जाऊन बघितल्यावर त्या तिघांच्या लक्षात आलं, की ते जर अजून थोडे वर गेले, तर त्या तिघांना एकमेकांकडे तोंड करून बसता येईल अशा तीन जागा होत्या. आणि शिवाय ते तिथे बसले तर कोणाला पटकन दिसले नसते. आणि शिवाय त्यांना मात्र वरून सगळंच दिसलं असतं.

एकदा त्या ढाकीचा शोध लागल्यावर रोज दुपारी शाळेतून आलं की तिघं जण त्या आंब्याच्या झाडावर चढून बसायला लागले. हळू हळू ते त्यांच्या अभ्यासाचं सामान तिथे नेऊन गृहपाठ तिथे करायला लागले. अक्षर वाईट यायचं, पण तरी तिथे बसूनच ते करण्यात मजा होती.

एक दिवस तिघं आपापल्या वह्या-पुस्तकं उघडून काहीतरी अभ्यास करत बसलेले असतांना झेलमच्या वहीवर एक काळं पांढरं ग्रे रंगाचं जाड उद्गारचिन्ह उमटलं. एक रेष आणि आणि खाली कळेल न कळेलसं टिम्ब!

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact