- शिल्पा दातार-जोशी

' द वे होम' हा चित्रपट म्हणजे प्रेमळ आजी आणि खडूस नातू वू यांची ही गोष्ट आहे. त्यांच्या काही दिवसांच्या सहनिवासाची ही गोष्ट आहे. वू हा सात वर्षांचा मुलगा. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल या मोठ्या शहरात राहणारा मुलगा. आपल्या आईबरोबर अत्यंत छोट्या डोंगराळ दुर्गम भागातल्या आजीच्या गावाला येतो. हे गाव आपल्याकडच्या एखाद्या अतिदुर्गम अशा आदिवासी पाड्यासारखं असतं. तुम्ही कधी अशी गावं पाहिली आहेत का? ज्यांनी पाहिली आहेत त्यांच्या लक्षात इथलं वातावरण येईल. गावाकडे येताना तो ज्या बसमध्ये बसतो, त्यात बरीचशी गावाकडचीच माणसं असतात. त्याला सेऊल शहरातले सुंदर रस्ते, मोठे मॉल, गगनचुंबी इमारती आणि त्यात राहणाऱ्या माणसांच्यात वावरण्याची सवय असते. त्यानं गाव आणि गावाकडची माणसं कधी बघितलेलीच नसतात. त्यामुळं त्याला आईबरोबर आपल्या आजीकडं अज्जिबात यायचं नसतं. बोअर होणार असतं. आपल्यालाही कधीतरी अशा ठिकाणी जाताना बोअर होतं; पण नंतर जेव्हा तिथलं वातावरण आवडायला लागतं, तसं तिथं राहावसं वाटतं. तिथली माणसं आवडायला लागतात. ते गाव सोडताना डोळयात पाणी तरळतं. तर आता वू अशाच ठिकाणी आलाय.
…वूच्या आईची नोकरी गेलेली असते. तिला नवीन चांगली नोकरी शोधायची असते आणि म्हणून वूला आजीकडं ठेवण्यावाचून पर्यायच नसतो. वूची आई ही एकटीच वूला वाढवत असते. मग तिला आपल्या संकटाच्या वेळी गावाकडं राहणाऱ्या आपल्या आईची आठवण येते. खरं तर ती आपल्या आईकडे खूप वर्षांनी आलेली असते. ही आजी शेती करते. या गावात फक्त सहा माणसं राहत असतात, इथं वीज, रस्ते, पाणी असं काही नसतं. अतिशय कमी खर्चात, कष्टाची कामं करत इथली माणसं राहत असतात. त्यातलीच वूची आजीही असते.
हेही वाचा!
वू आपल्या आईबरोबर आजीच्या घरी येतो. हे घर कसलं; एका खोलीची झोपडीच असते. पुढं एक पडवी असते. आजूबाजूला समृध्द निसर्ग. भरपूर झाड,पशुपक्षी असतात. घरातून पाठीत वाकलेली, काठी घेतलेली आजी दार उघडते. तिला बोलता येत नसतं. तिच्या अवताराकडं पाहून तो पंच्याहत्तर वर्षांच्या आजीला ‘डर्टी’ असं म्हणतो. आपल्या नातवाला पहिल्यांदाच पाहत असल्यानं तिला खूप आनंद होतो. ती त्याला ठेवून घ्यायला आनंदानं तयार होते, पण तो मात्र ‘आता इथं कसं राहायचं, ना पिझ्झा ना बर्गर’ असा विचार करत असतो. गेला बाजार त्याच्याकडं एक व्हिडिओ गेम असतो, पण त्याचीही बॅटरी कधीतरी संपणार असतेच.
वूला आजीकडं ठेवून आई जेव्हा जायला निघते, तेव्हा तिची आई तिला म्हणते,‘आजच्या दिवस तरी राहा की गं.'
आजीचा असा आग्रह पाहिल्यावर आपल्यालाही आपल्या आजीची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. कोणत्याही आजीला आपल्या मुलीनं आणि नातवंडांनी कितीही राहिलं तरी कमीच वाटत असतं .
वूच्या शहरातल्या नळाला पाणी असतं पण इथ आजीला डोंगर उतरून पाणी घेऊन यावं लागतं. घरातलं शिवणकाम ती स्वतःच सुईदोऱ्यानं करत असते. आजी खूप स्वावलंबी असते, आता तर नातू आलेला असतो. तिला काय करावं आणि काय नको असं होतं. पण नातू मात्र फारच हट्टी आणि लाडावलेला असतो.
पण आजीच्या जवळ राहताना हळूहळू त्याच्यात परिस्थितीनुसार बदल घडायला लागतात. त्याला आजीविषयी प्रेम वाटायला लागतं. आपण कसेही वागलो तरी तक्रार न करणारी ही आजी आहे तरी कशी, असं त्याला वाटतं. दरम्यानच्या काळात आपल्या नातवाला पाहिजे ते देण्यासाठी होणारी आजीची धडपड, त्याच्या खाण्यापिण्यापासून ते खेळांपर्यंतच्या गरजा आपण पूर्ण करू शकत नाही, या विचारांनी दुःखी झालेली आजी आपण इथं पाहतो . नंतर वू इतका बदलतो की तो आजीला तिच्या नकळत मदत करायला लागतो.

Image: thingsasian
आता जास्त लिहीत नाही. पण आजी आणि वूची ही गोष्ट तुम्ही पाहाच- त्याच्यात कसे बदल होतात, हेही आपल्याला जाणवतं. चला, वू आणि त्याच्या आजीच्या गावाला जाऊ या. हा दक्षिण कोरियन चित्रपट आहे, द वे होम’. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
चित्रपटः द वे होम
कुठं पाहालः youtube, www.Imdb.com, www.bilibili.tv, www.justwatch.com, tv.apple.com
- https://www.youtube.com/watch?v=bF_heBmg9Ss
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact