मनापासून चित्र काढण्याची आवड असणाऱ्या अचूवर आई का चिडते?

- शिल्पा दातार

 Image: freepik

कधी कधी लहान मुलांना काय आवडतं, ते मोठ्या माणसांना कळतच नाही. आपल्याला वाटतं, आई-बाबा असे का वागतात? आई-बाबांना वाटतं की, आपण जे सांगू तेच मुलांनी केलं पाहिजे. असं असलं की निराश व्हायला होतं. अशीच ही गोष्ट आहे, आपल्या चित्रकार मित्राची. अचूची! हा आपला मित्र चित्र काढण्यात अगदी रंगून जातो. त्याला चित्र आणि रंगकामापलीकडं काहीच दिसत नाही. आजूबाजूला कोण आहे, हेसुद्धा बरेचदा कळत नाही. आपलंही तसंच होतं. आवडती गोष्ट करताना आपण मनापासून करतो की नाही? तसंच त्याचं आहे.

अचूच्या आईला एक फोन येतो. फोनवरच्या व्यक्तीला ती सांगते, आमच्या अचूला ना चित्रं काढायला आवडतात. पण आमची इच्छा आहे की, त्यानं मोठं डान्सर व्हावं. त्याला आम्ही डान्सच्या क्लासला घातलं होतं; पण तो गेलाच नाही. त्यामुळं फी वाया गेली. आपलंही कधी कधी असं होतं. दुसऱ्या कुणाचं ऐकून किंवा स्वतःची आवड म्हणून आई-बाबा एखाद्या क्लासला घालतात, मग तो कधी कोणत्या खेळाचा असतो, भाषेचा असतो किंवा कला प्रकाराचा असतो. पण तिथं आपलं मन रमतंच असं नाही. मग कंटाळा येतो. आणि क्लास आवडत नाही म्हणून आपणही दांड्या मारतो. तसंच आपल्या अचूचं झालंय.

हेही वाचा!

आकाशातल्या रंगांच्या छटा, घरातल्या पोस्टर्समधल्या चित्रांमधील रंगछटा पाहून त्याप्रमाणे शेडिंग करण्याचा प्रयत्न करतो. शेडिंग कसं करायचं याचा विचार करतो. एक दिवस तो चित्र काढण्यात गुंग असतानाच आई चिडते, तो चित्र काढत असताना सगळ्या पेन्सिली टेबलावरून ढकलून देते. कागद चुरगळून फेकते. पण झोपेतही त्याला आकाशाचा निळा रंग, पाण्याचा निळा रंग या निळ्या रंगाच्या विविध छटाच आठवत असतात.

निराश झालेला अचू त्यानंतर चित्रच काढत नाही. आपल्या पेन्सिलींकडं वळून वळून पाहतो. आपल्याला एखादी गोष्ट करायला मिळाली नाही की आपण त्याच गोष्टीचा ध्यास घेतो तसं! त्यानंतर एक-दोन आठवडे जातात आणि आपल्या या मित्राच्या बाबतीत असं काही घडतं की ती घटना त्याचं आयुष्यच बदलून टाकते. असं काय घडत असेल बरं अचूच्या बाबतीत? त्याला त्याच्या रंगीत पेन्सिली परत मिळतात का? आई त्याला चित्र काढू देते का? हे सगळं ‘पेन्सील’ या लघुपटात बघताना मजा येईल. कधी कधी त्याची आई बघताना आपल्याला ‘अभ्यास कर’ असं सारखं सांगणारी आपली आईच आठवते. … चला तर मग डोळ्यांमधून बोलणाऱ्या या छोट्या चित्रकाराला भेटूया.

 Image: freepik

लघुपट- पेन्सिल

कुठं पाहाल? - यूट्युब

#short #pencil #malayalam

https://www.youtube.com/watch?v=rTmihwtKvSA

mrs.shilpapankaj@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact