पळणाऱ्यांना जोश अन लोकांना आनंद देणाऱ्या एका मॅरेथाॅन डाॅगची गोष्ट!

Image: tmz.com

त्याचं नाव स्पेन्सर. तो गोल्डन रिट्रिव्हर जातीचा कुत्रा.  अमेरिकेच्या बोस्टन शहरातला. हा साधासुधा कुत्रा नव्हता, तर तो मॅरेथाॅन डाॅग' होता. एक साधा कुत्रा ते मॅरेथाॅन डाॅग हा त्याचा प्रवास खूपच भारी होता. हा प्रवास स्पेन्सरने त्याचा मालक रिच पाॅवर यांच्या सोबतीने केला. रिचने आपल्या कुत्र्यातील गुण ओळखले आणि त्याने स्पेन्सरला प्रोत्साहन दिलं. स्पेन्सरला आज केवळ बोस्टन शहरातले लोकंच नाही तर अख्खं जग 'मॅरेथाॅन डाॅग' म्हणून ओळखतं.

स्पेन्सरचा जन्म  ८ ऑगस्ट २००९ साली एका 'ब्रीड फार्म'मध्ये झाला. रिच पाॅवर नावाच्या गृहस्थाने स्पेन्सरला त्यांच्या घरी आणलं. खरंतर पाॅवर यांच्याकडे 'मॅंण्डी आणि मिस्ट्री' हे दोन गोल्डन रिट्रिव्हर कुत्रे होते. त्यांना आणखी नवीन कुत्रा नको होता. पण अचानक मॅण्डी या कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मिस्ट्री मात्र उदास राहू लागली. जेव्हा मॅण्डीचा मृत्यू झाला, त्याच दिवशी ब्रीड फार्ममध्ये स्पेन्सरचा जन्म झाला होता. एके दिवशी रिच आपली पत्नी डाॅरे हिला ' चल आपण बाजारातून डांगर घेवून येवू' असं म्हणून बाहेर पडले. पण बाजारात न जाता ते ब्रीड फार्ममध्ये गेले. तिथे त्यांना आठ आठवड्यांचं एक पिल्लू दिसलं. ते त्यांना खूप आवडल. तेच त्यांनी घरी आणलं. घरी आल्या आल्या त्याने मिस्ट्रीशी मस्त दोस्ती केली. या पिल्लाचं नावं स्पेन्सर ठेवलं गेलं.

हेही वाचा!

स्पेन्सरकडे बघून रिच यांना नेहेमी वाटायचं की, ' स्पेन्सर हा साधासुधा कुत्रा नाही. त्याच्यात एक वेगळी चमक आहे. तो खूप स्मार्ट आहे!' स्पेन्सरची ही हुशारी चांगल्या ठिकाणी वापरायला हवी असं  रिच यांना वाटू लागलं. पण त्यांना स्पेन्सरला थेरेपी डाॅग बनवायचं नव्हतं. स्पेन्सर हा थेरेपी डाॅगच्याही पलीकडे आहे हे त्यांना समजलं होतं. आपला स्पेन्सर म्हणजे आनंद देणारा कुत्रा आहे. त्याने लोकांना आनंद द्यायला हवा. ते स्पेन्सरला दर मंगळवारी बोस्टनमधील शाळा, काॅलेज आणि हाॅस्पिटल्समध्ये घेवून जायचे. तिथे स्पेन्सर मुलांना, रुग्णांना भेटायचा. स्पेन्सरला भेटून, त्याच्याशी थोडा वेळ खेळून सगळ्यांनाच बरं वाटायचं.

स्पेन्सर हा खेळकर होता. त्याला फ्रीसबिस (प्लॅस्टिकची थाळी फेकणं- झेलणं) खेळायला आणि पोहायला खूप आवडायचं. त्याला पेनीसोबत खेळायलाही आवडायचं. ही पेनी म्हणजे त्याची भाची. तीन वर्षांनी स्पेन्सरपेक्षा छोटी. या पेनीवर स्पेन्सर काकाच्या नात्याने रुबाब करायचा. तिचं काही चुकलं की तिला दमात घ्यायचा. पण स्पेन्सर पेनीची खूप काळजी घ्यायचा. पेनी एकदा आजारी होती. तिचं ऑपरेशन कराव्ं लागलं. ऑपरेशनच्या दिवशी स्पेन्सरही तिथे रिच आणि डाॅरे यांच्यासोबत हजर होता. ऑपरेशन झाल्यानंतर पेनीच्या फिजिओथेरेपीच्या काळात स्पेन्सरने पेनीची थेरेपी डाॅगसारखी मदत केली. पेनीला वेदना झाल्या, पेनी घाबरली की स्पेन्सर तिच्या नाकवर नाक घासून तिला धीर द्यायचा, तिच्या वेदना कमी करायचा प्रयत्न करायचा.

Image: boston25news

 Image: boston.com

रिच हे नेहेमी बोस्टन मॅरेथाॅन पाहायला, मॅरेथाॅनमध्ये भाग घेतलेल्या रनर्सला चीअरअप करायला जायचे. स्पेन्सरला लोकांना भेटायला आवडायचं. स्पेन्सरला भेटून लोकांना आनंद होतो , प्रोत्साहन मिळतं हे रिच यांना माहिती होतं. आपण त्यालाही आपल्यासोबत न्यायला हवं असं रिच यांना वाटलं. ते २०१५ पासून स्पेन्सरला बोस्टन मॅरेथाॅन पाहायला घेवून जायचे. स्पेन्सरला तोंडात वस्तू धरुन बसायला फार आवडायचं. रिचने स्पेन्सरच्या तोंडात ' बोस्टन स्ट्राॅंग' नावाचा झेंडा धरण्यास दिला. ही मॅरेथाॅन २६. ८ मैल अंतराची असते. रिच स्पेन्सरला घेवून अडीच मैलाच्या थांब्यावर उभे राहायचे. रिच धावणाऱ्या रनर्सला हात हलवून चिअरअप करायचे तर बोस्टन तोंडात धरलेला झेंडा दाखवायचा. रनर्ससाठी एका कुत्र्याने चिअर अप करणं ही गोष्ट नवीन होती. ते कौतुकानं स्पेन्सरकडे पाहायचे. दरवर्षीच स्पेन्सर बाॅस्टन मॅरेथाॅनला तोंडात 'बोस्टन स्ट्राॅंंग' नावाचा झेंडा घेवून उभा राहायचा. २०१३ मध्ये बोस्टन मॅरेथाॅनमध्ये बाॅम्बस्फोट झाला होता. त्याचा धसका प्रेक्षकांनी आणि रनर्सनेही घेतला होता. बोस्टन मॅरेथाॅनसाठी लोकांचा , रनर्सचा उत्साह वाढवणे गरजेचे होते. ही गरज ओळ्खूनच रिच यांनी स्पेन्सरला बोस्टन मॅरेथाॅनमध्ये न्यायचं ठरवलं होतं. त्यांचा हा उद्देश सफल झाला होता.

ऊन, सावली, पाऊस, थंड वारा काहीही असू देत स्पेन्सर चार चार तास जागेवरुन न हलता मॅरेथाॅन पाहायचा. रिचने नंतर आपल्या जॅकेटचं स्पेन्सरच्या मापाचं एक जॅकेट शिवून घेतलं. ते घालून त्याला बोस्टन मॅरेथाॅनला नेलं. भर पावसात ते जॅकेट घालून स्पेन्सर रनर्सला प्रोत्साहन देत होता. हा व्हिडिओ रिच यांनी सोशल मीडियावर टाकला आणि तो व्हायरल झाला. रिच यांना ' पुढच्या मॅरेथाॅनलाही स्पेन्सरला आणाच' असे निरोप इ मेलवर यायला लागले. दरवर्षी मॅरेथाॅनला जायचंच ही बाब स्पेन्सरसाठी सवयीची झाली होती. अगदी २०२०मध्येही नेहेमीच्या तारखेला स्पेन्सर रीचसोबत मॅरेथाॅनच्या स्थळी गेला. तोंडात ' बोस्टन स्ट्राॅंग' हा झेंडा होताच. पण कोविडमुळे त्यावर्षीची बोस्टन मॅरेथाॅन रद्द झाली होती.

२०२० मध्ये स्पेन्सर आजारी पडला. स्पेन्सरला ट्यूमर झाला. ऑपरेशन करुन ट्यूमर काढला. त्याच्यवर केमोथेरेपीचे उपचारही झाले. स्पेन्सर या आजारातून वाचणार नाही अशीच खात्री होती, पण स्पेन्सर वाचला आणि पुन्हा एप्रिल २०२१मध्ये बोस्टन मॅरेथाॅनला त्याने हजेरी लावली. त्यावर्षी कोविडमुळे एप्रिलऐवजी ऑक्टोबरमध्ये बोस्टन मॅरेथाॅन आयोजित करण्यात आली होती. स्पेन्सरने ऑक्टोबर २०२१ ला बोस्टन मॅरेथाॅनला हजेरी लावली. आता स्पेन्सर खूपच लोकप्रिय झाला होता. मॅरेथाॅनमध्ये भाग घेणाऱ्या रनर्सचा तो आवडता झाला होता. रनर्सची आणि स्पेन्सरची चुकामूक होवू नये म्हणून रिचचे मित्र रस्त्याच्या एका बाजूला हातात होर्डिंग धरुन उभे राहायचे. 'स्पेन्सर रस्त्याच्या उजव्या बाजूला बसलेला आहे' असं या होर्डिंगवर लिहिलेलं असायचं. रनर्स आवर्जून स्पेन्सरची दखल घ्यायचे. थोडा वेळ थांबून त्याला मिठी मारायचे, कुरवाळायचे, त्याच्यासोबत फोटो काढायचे. यामुळे त्यांच्या फिनिशिंग टायमिंग वाढयचा; पण त्याची त्यांना चिंता नव्हती. स्पेन्सरमुळे मॅरेथाॅन रनर्सचा वाढणारा उत्साह आयोजकांच्याही लक्षात आला. त्यांनी स्पेन्सरच्या कामाची विशेष दखल घेतली. २०२२ च्या बोस्टन मॅरेथाॅनच्या आदल्या दिवशी स्पेन्सरचा 'बोस्टन ॲथेलिटस असोसिएशन'ने विशेष सत्कार केला. त्याला खास आलिशान लुमिझिनी गाडीत बसवून कार्यक्रमाच्या ठिकाणी आणलं गेलं. स्पेन्सरला बोस्टन मॅरेथाॅनची रिबीन घालण्यात आली. त्याला ' ग्रॅण्ड बर्कशल' आणि ' व्हेरी इम्पार्टंण्ट पप' नावाचा किताब देवून त्याचा सत्कार करण्यात आला.

Image: localnews8.com

जून २०२२ मध्ये रिच यांनी स्पेन्सरचा १३ वा वाढदिवस साजरा केला. स्पेन्सरची लोकप्रियता इतकी की ७०० लोकं त्याला भेटण्यास आले. पण २०२२ ची बोस्टन मॅरेथाॅना स्पेन्सरची अखेरची मॅरेथाॅन ठरली. २०२२ च्या शेवटी शेवटी स्पेन्सर पुन्हा कॅन्सरने आजारी पडला. दिवसेंदिवस अशक्त होवू लागला. शेवटी १५ फेब्रूवारी २०२३ ला त्याचा मृत्यू झाला. बोस्टन मॅरेथाॅनला अवघे दोन महिनेच उरले होते. ही बातमी जेव्हा रिचने जाहीर केली तेव्हा बोस्टनमधील प्रत्येकाला दु:ख झालं. प्रत्येकजण स्पेन्सरच्या मृत्यूने हळहळला. त्याची आवडती सोबतीण पेनी देखील स्पेन्सरच्या मृत्यूने खचली. आठ दिवसातच तिनेही प्राण सोडले.

बोस्टन मॅरेथाॅनमधील स्पेन्सरचं योगदान कोणीच विसरु शकत नव्हतं. स्पेन्सरला आगळी वेगळी श्रध्दांजली देण्याचं बोस्टनच्या नागरिकांनी ठरवलं. ज्यांच्याकडे गोल्डन रिट्रिव्हर आहेत ते सर्वजण आपले कुत्रे घेवून बोस्टन मॅरेथाॅनला येतील आणि मॅरेथानमध्ये सहभागी होणाऱ्या रनर्सला चिअरअप करतील. या आवाहनाला बोस्टनमधील नागरिकांनी उत्सफूर्त दाद दिली. ही मॅरेथाॅन पाहाण्यासाठी नेहेमीपेक्षा कितीतरी जास्त प्रेक्षकांनी या मॅरेथाॅनला हजेरी लावली. पण प्रेक्षकांना आणि मॅरेथाॅनमध्ये धावणाऱ्या रनर्सलाही तेथील प्रत्येक गोल्डन रिट्रिव्हरमध्ये त्यांचा आवडता स्पेन्सरच दिसत होता. बोस्टनचे नागरिक या ' मॅरेथाॅन डाॅग'ला कधीच विसरु शकणार नाही हेच खरं!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact