करा – चिकू आणि गुलकंद शेक!

स्वयंपाकघरातली लुडबुड

- प्रद्युम्न पंडित.

Image - Google.

 

हॅलो! थीक शेक तुम्हाला आवडतात ना? आणि उन्हाळ्यात काही ना काही तरी गारेगार आपल्याला हवंच असतं प्यायला. आज मी तुम्हाला चिकू गुलकंद शेकची रेसिपी सांगतो. करुन बघा, पिऊन बघा आणि सांगा मला आवडला की नाही ते. ओके?

चिकू गुलकंद शेकसाठी साहित्य - स्वच्छ धुवून सोलून कापलेले दोन मोठे चिकू, दोन ते तीन चमचे गुलकंद, चार स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम, तीन चमचे साखर, एक ग्लास न तापवलेलं गार दूध, बर्फाचे खडे आणि गार्निशिंगसाठी वाळवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या.

चिकू गुलकंद शेकची कृती - मिक्सरच्या जारमध्ये चिकू, गुलकंद, साखर, बर्फाचे खडे आणि दूध घालून दोन ते तीन मिनिटं फिरवून घ्या. मग त्यात आईस्क्रीमचा स्कूप घालून पुन्हा मिनिटभर फिरवून घ्या. हे मिश्रण गाळणीने गाळून घ्या.

हा शेक कॅफे किंवा हॉटेलसारखा सर्व्ह करायचा असेल तर काचेच्या ग्लासमध्ये बारीक चिरलेला चिकू, गुलाबाच्या पाकळ्या घाला. वरती तुमचा तयार शेक ओता. त्याच्यावर आईस्क्रीमचा स्कूप ठेवा आणि गुलकंद किंवा गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश करा. तुम्ही प्या आणि आईबाबांनाही द्या!

थीक शेक करण्यासाठी एक मस्त टीप देऊ का तुम्हाला? थीक शेक किंवा मिल्कशेक करताना न तापवलेलं गार दूध वापरा. गार दूध आणि आपली नेहमीची साखर असं एकत्र फेटलं तर आपले थीक शेक्स मस्त फेसाळ होतील. पण हो, पिठीसाखर मात्र वापरु नका... चालेल ना?

(लेखक मुंबई स्वयंपाकघर फेसबुक ग्रुपचे सदस्य आहेत.)