
Image:audubon
इंग्लडमध्ये स्विफ्टस पक्ष्यांची घटती संख्या वाढवण्यासाठी नवीन इमारती बांधताना भिंतीवर स्विफ्टस ब्रिक्स बसवण्याचा प्रयोग केला जात आहे, याबद्दल आपण आधी वाचलेलं आहे. हे स्विफ्ट पक्षी म्हणजे रेकाॅर्ड ब्रेकर ॲथलिट्सच . ही त्यांची ओळख त्यांच्या उडण्याच्या कौशल्यामुळे त्यांना प्राप्त झाली आहे. पृथ्वीवरील सर्वात वेगाने उडणारे पक्षी म्हणून स्विफ्ट पक्षी ओळखले जातात. हे स्विफ्ट पक्षी म्हणजे निसर्गातले ॲथलिट्सच तर आहेतच पण आता शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधानुसार वर्षातले दहा महिने उडत राहाण्याचा विक्रमही हे स्विफ्ट पक्षी करतात. स्विफ्ट पक्ष्यांच्या या विक्रमामुळेच जगभरात या पक्ष्याविषयीचं कुतुहल वाढलं आहे. या कुतुहलामुळेच शास्त्रज्ञ या स्विफ्ट पक्ष्यांच्या आकाशातील हालचालींकडे सूक्ष्म ट्रॅकर्सच्या सहाय्याने लक्ष ठेवत आहेत. त्यांची पाहाणी करत आहेत. त्यातून या स्विफ्ट पक्ष्यांचे बरेच बारकावे समोर आले आहेत.
ठेंगणे ठुसके स्विफ्टस पक्षी हे त्यांच्या लांब आणि अरुंद पंखामुळे आणि त्यांच्या एकरेषीय शरीरामुळे उडण्यात तरबेज असतात. त्यांना आकाशातले फाॅर्म्युला वन कार रायडरचं म्हटलं जातं. फ्रायगेट पक्षी आणि अल्पाइन स्विफ्ट्स हे न थांबता अनेक महिने उडणारे पक्षी म्हणून ओळखले जातात. पण न थांबता सलग दहा महिने उडत राहाणारे स्विफ्टस हे एकमेव पक्षी आहेत.
हेही वाचा!
उडता उडताच खाणं आणि झोपही
दहा महिने सलग उडताना स्विफ्ट पक्षी उडता उडताच किडे खातात, उडता उडताच घरटं बांधण्यासाठी पिसं गोळा करतात. हे स्विफ्ट पक्षी उडता उडताच झोप देखील काढतात, हे देखील शास्त्रज्ञांना त्यांच्या अभ्यासातून लक्षात आलं आहे. पक्षी असो वा प्राणी किंवा माणूस. झोप ही सर्व अवयवांना आवश्यक असते. पण हे स्विफ्ट पक्षी उडता उडता कसे बरं झोपत असतील? तर शास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीत त्यांना असं आढळलं आहे की पहाटे आणि सांजवेळी काही काळ स्विफ्ट पक्षी थोडे खालून उडतात. हा त्यांचा झोपेचा काळ असतो. उंचावरुन खाली उडताना त्यांना पंखांची जास्त हालचाल करावी लागत नाही. या काळात ते झोप घेतात. झोप घेताना एक डोळा मिटलेला तर एक डोळा उघडा असतो. मेंदूचा काही भाग झोपलेला तर काही भाग हा जागा असतो. अशा प्रकारे हे स्विफ्ट पक्षी उडता उडताच झोप काढतात.

Image: birdfact

Image: naturescalendar
स्विफ्ट पक्षी खरंच दहा महिने उडतात का?
कितीही खरं मानायचं ठरलं तरी प्रश्न पडतोच की खरंच स्विफ्ट पक्षी सलग दहा महिने उडत असतील का? या शंकेचाही शोध पक्षीतज्ज्ञांनी आणि शास्त्रज्ञांनी घेतला आहे. या शोधाचा निष्कर्ष सांगतो, की स्विफ्ट पक्षी खरोखर दहा महिने आकाशात उडत असतात. शास्त्रज्ञांनी सलग दोन वर्ष १९ स्विफ्ट पक्ष्यांच्या आकाशातल्या हालचालींचा बारकाईनं अभ्यास केला. हा अभ्यास सांगतो की स्विफ्ट पक्षी स्थलांतर करतात तेव्हा स्वीडनवरुन निघतात आणि उडत उडत युरोपमधील पेनिनसुला येथे पोहोचून तिथून पश्चिम आफ्रिका ते मध्य आफ्रिका इथपर्यंत उडत जातत. परतीचा प्रवास करताना स्विफ्ट पक्षी लिबेरिया येथून करतात. या ठिकाणी आठवडाभर स्विफ्ट पक्ष्यांचा मोठा मेळा भरलेला असतो. हे स्विफ्ट पक्षी मोठ्या संख्येने तिथे येतात ते वाळवी या किटकांवर ताव मारण्यासाठी. लाखो स्विफ्ट पक्षी येथे येतात.
स्थलांतराच्या काळात उडताना स्विफ्ट पक्ष्याच्या प्रजातींमध्ये थोडं वैविध्यही आढळून आलं. त्यात स्विफ्ट पक्ष्याच्या काही प्रजाती मध्ये चार रात्रं जमिनीवर येतात, काही प्रजातीचे स्विफ्टस हे काही तास खाली उतरतात. पण अनेक स्विफ्टस हे दहा महिन्याच्या काळात एकदाही एक क्षणही खाली उतरलेले आढळले नाहीत.
वर्षातले दोन महिने स्विफ्ट पक्षी उत्तर युरोपमध्ये घालवतत. त्यात इंग्लडचाही समावेश आहे. या दोन महिन्याच्या काळात येथे प्रजनन, अंडी घालणं, पिल्लं अंड्यातून बाहेर येणं, त्यांची वाढ होणं हे सर्व घडतं. आणि मग दोन महिन्यानंतर हे स्विफ्ट पक्षी आफ्रिकेच्या दिशेने उडत जातात. लहानाचे मोठे झालेले स्विफ्ट पक्षी जे तरूण असतात, ते एकदा उडाले की लवकर युरोपमध्ये परतत नाही. त्यांच्या पंखात इतकी ताकद आणि उत्साह असतो की दहा महिनांपेक्षा जास्त काळ ते उडतच राहातात.
थोडाही गाजावाजा न करता न थांबता महिनोनमहिने सलग उडणारे हे स्विफ्ट पक्षी म्हणजे निसर्गातला चमत्कारच म्हणावा, नाही का?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact