आज काय 'बघाल'?
- डॉ. अस्मी अच्युते

हॅलो! तुम्ही सगळे शाळेत जाता, क्लासला जाता, तिथे तुमची मस्ती सुरु असते ना? तसाच एक छोटा मुलगा आहे चिखलू नावाचा. मंगलपाडा नावाच्या एका लहानशा गावात राहातो चिखलू. हा चिखलू प्रचंड खोडकर आहे. सगळ्यांच्या खोड्या काढत राहातो आणि मग त्यांची बोलणीही खातो. पण तो घाबरत मात्र कुणालाच नाही! अगदी गावाच्या वेशीवरच्या जंगलात राहाणाऱ्या भुत्यालासुद्धा… भुत्याला गावातले सगळेच घाबरतात. भुत्या आहेच तसा जरा भिती वाटावी असा… म्हणजे तुम्ही काय म्हणता? डेंजरस.. हो ना? तर हा भुत्या आहे डेंजरस.
एकदा आपला हा चिखलू संध्याकाळी त्या जंगलात हरवतो आणि त्याला भुत्या भेटतो. आपला शूरवीर चिखलू घाबरतो ना मग… बोबडी वळते त्याची. पण कसा तरी करुन येतो निसटून त्याच्या तावडीतून.
चिखलू खोडकर असला तरी हुशार असतो. स्मार्ट! तो ठरवतो, आपल्याला ओरडणाऱ्या सगळ्यांना अद्दल घडवण्यासाठी आपण भुत्याशी दोस्ती करायची. भुत्याशी दोस्ती करायची तर थोडा होमवर्क हवाच ना. चिखलू तयारीला लागतो. भुत्या कसा दिसतो, कुठे राहतो, काय खातो, तो डेंजर कसा आहे हे सगळे प्रश्न चिखलूला पडलेले असतात. या प्रश्नांची उत्तरं चिखलू कसा शोधतो? तो भुत्याला कसा भेटतो? त्यांची दोस्ती होते का? मग ते दोघं मिळून काय करतात?
पडले ना प्रश्न तुम्हालाही? मग एक काम करा, ‘पक पक पकाक’ नावाचा मस्त सिनेमा आहे यु ट्युब वर, तुम्ही पाहा, जमलं तर मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊन घरीच सिनेमा पार्टी करा, मजा येईल! आणि सिनेमा कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


