ईशानने शेतातल्या टोमॅटोच्या झाडावरचे किडे परागीभवन करतांना बघितलेलेच होते, त्यामुळे ते शेतकऱ्याला मदत करतायत हे त्याला मान्य होतं, पण गांडूळ??? एकतर ते वळवळ करतं, आणि ओलं गुळगुळीत दिसतं, तर ते आपल्या शेतात कशाला ठेवायचं असा प्रश्न साहजिकच त्याला पडलेला होता आणि तो त्याने आत्तूला विचारला. मग आत्तूने त्याला गांडूळ कशी माती भुसभुशीत करतं, गांडुळाच्या विष्ठेमुळे जमीन कशी सुपीक होते ते समजावून सांगितलं आणि म्हणाली, “आता एखादा किडा किंवा एखादं गांडूळ जर आपलं एवढं काम करत असेल, तर आपण त्याला मारणं बरोबर आहे का?”
“नाही…” ईशान म्हणाला, “पण गांडुळं आणि किडे ही सगळी मदत शेतकऱ्याला करतात. पण ते किडे जर आपल्या घरात आले तर आपण काय करायचं? कारण आपल्या घरात तर काही शेतबीत नाहीये.”
“बरोबर.” आत्तू मान डोलवत म्हणाली, “पण आपण जे अन्न खातो, भाज्या, फळं, धान्य, डाळी त्या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याकडूनच विकत घेतो. त्याचे आपण पैसे देतो हे बरोबर, पण जर का धान्य उगवलंच नाही, तर कितीही पैसे देऊनसुद्धा आपल्याला काहीच खायला मिळणार नाही. आणि म्हणूनच, जरी आपल्या घरी शेत नसलं, तरी आपण आपल्या घरात आलेल्या किड्यांना मारायचं नसतं. ते चुकून आपल्या घरात आलेले असतात. आपण त्यांना दारं खिडक्या उघडून द्यायच्या, म्हणजे ते आपोआप थोड्या वेळाने बाहेर जातात.”
आत्तूचं म्हणणं ईशानला पूर्णपणे पटलेलं होतं. कारण चक्कर मारायला निघाल्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे किडे किती काम करतात आणि त्यामुळे माणसांना किती मदत होते हे त्याने बघितलेलं होतं. त्यामुळे आत्तू म्हणाली, तसं “दिसला किडा की मार फवारा” असं करायचं नाही हे त्याला मान्य होतं. आणि म्हणूनच, शेतातल्या काका काकूंनी दिलेला खाऊ खाऊन आत्तूच्या मागे स्कूटर वर बसून घरी जातांना त्याच्या मनात एक प्लॅन तयार झाला होता.
घरी पोचल्या पोचल्या ईशान आईला म्हणाला, “आई तो किड्यांचा स्प्रे दे गं जरा…”
आपण एवढं समजावून सांगून सुद्धा हा मुलगा परत तेच करतोय असं वाटून आत्तूने कपाळाला हात लावला आणि तेवढ्यात… ईशानने स्प्रेची ती बाटली कायमसाठी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली!


