ईईईईईईईई! आपण किडे मारले तर बिघडलं काय?- भाग ८

ईशान उभा होता त्या टोमॅटोच्या झाडाच्या खोडाशी काहीतरी वळवळलं, म्हणून तो दचकून मागे झाला.

image : brgfx

त्याने वाकून बघितलं, तर झाडाच्या खोडापाशी एक गांडूळ जमिनीतून बाहेर आलं. ते बघून ईशान ईईईईईईई करून ओरडणार तेवढ्यात ते घाईघाईने परत आत गेलं. दुसरीकडून दुसरं गांडूळ बाहेर आलं. तेही परत आत गेलं. गांडूळं अशी जमिनीतून नुसती आतबाहेर का करतायत ते ईशानला कळेना. आणि बाकीचं शेत एवढं स्वच्छ ठेवणाऱ्या माणसांनी ती गांडुळं काढून का टाकली नाहीत तेही त्याच्या लक्षात येईना. तिथे अजून जरा वेळ उभं राहिल्यावर त्याच्या लक्षात आलं, की एका जागी शांत उभं राहिलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतात. काही टोमॅटो कच्चेच गळून खाली पडलेले होते. ते खायला पण काही वेगळ्या प्रकारचे किडे आलेले होते. त्यात उडणारे, चालणारे, सरपटणारे सगळ्या प्रकारचे किडे होते. आणि मुख्य म्हणजे त्यातला एकही किडा त्याला चावायला आलेला नव्हता. ते त्यांच्या त्यांच्या कामात बिझी होते.

बराच वेळ हे सगळं बघून ईशान आत्तूकडे गेला आणि तिला म्हणाला,

“मला खूप किडे दिसले.”

“व्हेरी गुड. तुला चावले का ते किडे?”

“नाही.”

“नाही ना? गुड! काय करत होते ते किडे?”

मग ईशानने काय काय बघितलं होतं ते आत्तूला सांगितलं. आणि किडे कसे नुसते या फुलावरून त्या फुलावर उड्या मारत फिरत होते ते सांगितलं. पण ते किडे तसे का करतात आणि आपण त्यांना का मारत नाही ते त्याला कळलेलंच नव्हतं. आत्तू म्हणाली,

“आपण ते किडे मारत नाही, कारण ते किडे परागीभवन करतात.”

“काय करतात???” ईशान ओरडलाच.

“अरे म्हणजे ते या फुलावरचे परागकण त्या फुलावर नेऊन पोचवतात. ते एका फुलावर बसतात तेव्हा त्या फुलाचे पराग त्यांच्या पायाला, पंखाला चिकटतात, आणि ते दुसऱ्या फुलावर गेले की ते पराग तिथे खाली पडतात. आणि असं जितकं जास्त होईल तितकं पीक चांगलं येतं. टोमॅटो जास्त येतात आणि शेतकऱ्याला फायदा होतो. म्हणून फक्त आपल्याला त्रास देणारे किडे मारायचे. दिसला किडा की मार फवारा असं करायचं नाही.”