कचराकुंडीवर कुजलेलं शिळं अन्न किडे का खातात ते ईशानला कळेचना. आत्तू म्हणाली,

“कारण या किड्यांचं तेच काम असतं.”
“काय?”
“ओला कचरा खायचा, त्याचे तुकडे करायचे आणि त्याचं विघटन लौकर होण्यासाठी लागणारी रसायनं त्यावर सोडणं. हे किडे असतात म्हणून कचरा लौकर नष्ट होतो. ते नसते तर माणसाने तयार केलेला कचऱ्याचा ढीग कधी नष्ट झाला असता कोण जाणे?”
“पण ते हे काम का करतात?” ईशानने विचारलं.
“कारण पर्यावरणामध्ये त्यांचं काम तेच आहे. झाडांचं काम कार्बनडायओकसाईड शोषून घेऊन ऑक्सिजन तयार करणं हे आहे, प्राण्यांचं काम त्या झाडांची पानं, फळं, फुलं खाणं हे आहे, तसं किड्यांचं काम त्यातून तयार होणाऱ्या कचऱ्याचं विघटन करणं हे आहे.”
“जगातले सगळे किडे कचरा खातात?”
“नाही नाही… किड्यांमध्ये पण माणसासारखी वेगवेगळी कामं असतात. बघायची आहेत का तुला?”
“हो…” ईशान लगेच तयार झाला. कारण त्याला ही सगळी माहिती घेऊन शाळेतल्या मित्रमैत्रिणींसमोर खूप भास मारता आला असता. आणि शिवाय दुसरीकडे जायचं म्हणजे आत्तूबरोबर अजून लांबची चक्कर! आणि चक्कर मारायला कधी कोणी नाही म्हणतं का? चक्कर मारण्याच्या बाबतीत त्याचा अंदाज एकदम करेक्ट निघाला.
आत्तू आणि ईशान स्कूटर वर बसले आणि चक्कर मारायला निघाले.
पाच मिनिटं झाली, दहा मिनिटं झाली तरी आत्तू कुठेच थांबेना. आता ते शहराच्या ऑलमोस्ट बाहेर येऊन पोचले होते. घरं लांब लांब दिसायला लागली होती. ईशानला आता मजा येत होती. शहराच्या या बाजूला तो कधीच आलेला नव्हता.
हळूहळू शहर मागे पडलं आणि आजूबाजूला शेतं दिसायला लागली. अशाच एका शेतात एक छोटंसं घर बांधलेलं होतं. शेतातून त्या घरापर्यंत जाणारा एक कच्चा मातीचा रस्ता दिसत होता. आत्तूने त्या रस्त्याला स्कूटर वळवली, आणि थेट त्या घराच्या अंगणात नेऊन उभी केली. तिने हेल्मेट काढून आरशावर लावलं, स्कूटर साईड स्टँडवर लावली आणि ईशानला म्हणाली,
“उतर खाली!”


