कडकडून चावणाऱ्या किड्यांची गोष्ट!

कडकडून चावणाऱ्या किड्यांची गोष्ट!

  • डॉ. अस्मी अच्युते

सध्या उन्हाळा सुरु आहे, रात्री उकडतं पण खूप आणि डासही खूप चावतात, मग तुम्ही सगळे मच्छरदाणीत झोपत असाल ना? आणि तुम्हाला लाल -काळ्या मुंग्या पण दिसत असतील - धान्याची साठवणी करतात या काळात त्या.

हळू हळू उन्हाळा संपून पावसाळा सुरु होईल, तसं तुम्हाला झाडांवर काजवे दिसू लागतील. रातकिड्यांचा आवाज ऐकू येऊ लागेल. मग अंगणात, बागेत लाल पैसे दिसू लागतात. लाल लाल मखमली मृगाचे किडे पण दिसतील, चमकदार बीटल्स दिसतील. काळे ठिपके असलेले लाल लेडीबग पाहायला मिळतील. हेलिकॉप्टर सारख्या पंखांचे चतुर मजेत उडताना दिसतील.

मधूनच एखाद्या झाडाजवळ गेलात, तर हिरव्या रंगाचे मोठेमोठे टोळ - नाकतोडे सापडतील. रात्री दिव्यांच्या प्रकाशात छान छान नक्षी असलेले मॉथ दिसतील. मधमाशा, गांधीलमाशा, मातीचं घर करणारी कुंभार माशी, रंगीबेरंगी फुलपाखरं - कितीतरी कीटक आपल्याच भोवताली आपल्याला दिसत असतात.
बऱ्याचदा घाबरून आपण कित्येक किड्यांना मारतो, त्यांच्यापासून दूर पळतो. पण ह्या सगळ्या किड्यांचं मिळून एक छानसं जग आहे. खूप खूप महत्वाचे आहेत हे किडे आपल्यासाठी. "किडा आपल्याला चावतो " एवढी एकच गोष्ट आपल्याला माहित असते. पण हे किडे -कीटक काय काय मजेशीर गोष्टी करतात, त्यातून निसर्गाला कशी मदत होते, लहानसा हा जीव केवढा महत्वाचा असतो हे आपल्याला माहीतच नसतं.

Image - Google

किड्यांबद्दलच्या रंजक, इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित करून घ्यायच्या असतील ना, तर युट्युब वर जा, 'साय शो किड्स' चॅनेल वर 'मोस्ट अमेझिंग इन्सेक्ट फॅक्ट ' नावाचा एक व्हिडिओ आहे तो बघा - मग तुम्ही सगळ्यांना किड्यांची माहिती देऊ शकाल.