तनिषाच्या एका चुकीने समुद्रातील डाॅल्फिनचा झाला संताप!

Image:- freepik

तनिषा फोन सॅकमध्ये ठेवणार तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, 'तो बघ तिकडे डॉल्फिन!' हे ऐकल्यावर तिने घाईघाईने फोन परत हातात घेतला आणि सगळे बघत होते तिकडे बघायला लागली. पण तेवढ्यात तो डॉल्फिन (असलाच तर!) परत समुद्रात गडप झाला होता. पण एकदा कोणालातरी डॉल्फिन दिसल्यामुळे आता बोटीतले लोक एक्साईट होऊन चारही बाजूंना कुठे डॉल्फिन दिसतोय का ते शोधत होते. तनिषाने मध्ये वेळ म्हंटल्यावर घाईघाईने फोनचा फ्रंट कॅमेरा चालू करून ठेवला. उगीच डॉल्फिन दिसला आणि आपल्याला सेल्फी घेता आला नाही असं व्हायला नको ना!

पण त्यामुळे झालं असं की सगळे ज्या बाजूला बघत असतील त्या  दिशेला बघून तिला काहीच उपयोग होत नव्हता. त्यामुळे ती सगळ्यांकडे पाठ करून बसली. हातातल्या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात आरशात बघितल्यासारखे डॉल्फिन बघायचे आणि डॉल्फिन दिसले की स्माईल देऊन सेल्फी काढायचे असा तिचा प्लॅन होता. पण प्रॉब्लेम असा व्हायला लागला की तिला काही केल्या बसून हवा तसा अँगल मिळेना. आणि उभं रहायचं तर तिच्या हातात फार सामान गोळा झालं होतं. सॅक, मोबाईल, गॉगल आणि मगाशी खाऊन पिऊन संपवलेला वेफर्सचा पुडा आणि सॉफ्ट ड्रिंकची रिकामी बाटली.

तिने हातातल्या सामानाकडे क्षणभर बघितलं, गॉगल डोळ्यांना लावला आणि रिकामी बाटली आणि वेफर्सचा पुडा मोटारबोटच्या बाहेर टाकून दिला.

हेही वाचा!

तो प्लॅस्टिकचा रिकामा पुडा आणि प्लॅस्टिकची रिकामी बाटली तनिषाच्या समोर तरंगत तरंगत बोटीपासून जरा लांब गेले. पण तिचं त्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती आपली मोबाईलच्या कॅमेऱ्याचा अँगल ऍडजस्ट करणं, त्यात आपलं स्माईल छान येतंय का पाऊट भारी दिसतोय याचा विचार करणं आणि इतर लोक कुठल्या दिशेला डॉल्फिन शोधतायत याचा अंदाज घेणं यात बिझी होती.

तिने मोबाईलमधून बाहेर बघून जरा जरी समोर लक्ष दिलं असतं, तरी तिला दिसलं असतं, की त्या तरंगणाऱ्या वेफर्सच्या पुड्याच्या आणि सॉफ्ट ड्रिंकच्या बाटलीच्या खाली, समुद्रात खूप जोरात खळबळ होत होती. आणि ते जे कोणी खाली खळबळ करत होतं, ते कुठल्याही क्षणी उसळी मारून बाहेर आलं असतं.

तनिषाच्या बोटीतली माणसं एका बाजूला डॉल्फिन बघत होती आणि तनिषा सेल्फीफ्रेम आणि अँगल सेट करायची खटपट करत होती तेव्हा त्यांच्या बोटीच्या अगदी जवळ असणाऱ्या एका लहान वयाच्या नोझी नावाच्या डॉल्फिनचा संताप संताप झाला होता. त्याच्या नाकाच्या छान आकारामुळे बाकीचे डॉल्फिन्स त्याला लाडाने नोझी म्हणायचे. शिवाय काही डॉल्फिन्सचं असंही म्हणणं होतं, की तो त्याचा संबंध नसलेल्या गोष्टींमध्ये नाक खुपसतो. त्याही कारणाने काही डॉल्फिन्स त्याला नोझी म्हणायचे. आणि आत्ता त्याचं तेच छान शेप असणारं, आणि ज्या त्या विषयात खुपसायला कमी येणारं नाक वर करून तो समुद्राच्या आतून वर आकाशाकडे बघत होता. त्याला दिसत होतं, की परत कोणीतरी त्याच्या समुद्रात, त्याच्या घरात घाणेरड्या प्लास्टिकचा कागद आणि बाटली टाकली होती.

इतके दिवस डॉल्फिन्स आणि सगळ्या माशांनी समुद्रात सतत येत राहणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तूंकडे दुर्लक्ष केलं होतं. पण हळूहळू त्या वस्तूंचा ढीग वाढतच चालला होता. कारण यातली कुठलीच वस्तू कधीच विरघळली नव्हती.

त्यात काय वाट्टेल ते होतं… प्लॅस्टिकच्या बाटल्या, रॅपर्स, प्लास्टिकचे कागद, मोठमोठ्या प्लॅस्टिकच्या वस्तू, जुन्या इलेकट्रॉनिक वस्तू, प्लॅस्टिकचे दोर, मासे पकडायची जुनी जाळी, फुटलेले फुगे, काचेच्या बाटल्या, प्लास्टिकचे कप, प्लेट्स, चमचे… बरं या वस्तू गपचूप त्यांच्या त्यांच्या तळाशी जाऊन बसतील म्हणावं, तर तसंही काही नव्हतं. त्यातल्या काही वस्तू बुडायच्या, पण काही मात्र तरंगायच्या. त्या सगळ्याच माशांच्या आणि जलचरांच्या मध्ये मध्ये यायच्या. पण विषय त्याहून गंभीर होता

Image: freepik

हे सगळं काय आहे ते माशांना, ऑक्टोपसना, सापांना, खेकड्यांना, कासवांना समजायचं नाही. आणि ते त्याची शिकार करायला जायचे. मग अनेक माशांचे पंख फाटायचे, काही वेळा मासे अन्न समजून छोटे प्लॅस्टिकचे मणी गिळायचे आणि ते त्यांच्या घशात किंवा पोटात अडकून बसायचे. किनाऱ्यावरून लोकांनी शांततेचं, प्रेमाचं प्रतिक म्हणून हवेत सोडलेले फुगे फुटले की पाण्यात पडायचे. मासे ते फुगे गिळायचे. त्या फुग्यांना बांधलेल्या दोऱ्यांमध्ये छोट्या माशांचे पंख, कासवाच्या पिल्लांचे पाय गुरफटून जायचे आणि मग त्यांना ते सोडवता यायचे नाहीत. एकदा तर त्या डॉल्फिनने जुन्या कोळ्याच्या जाळ्यात अडकून बसलेला ऑक्टोपस बघितला होता. त्या ऑक्टोपसला कधीच त्या जाळ्यातून स्वतःची सुटका करून घेता आली नव्हती.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact