
Image:- freepik
कोळ्यांनी मासे पकडणं किंवा एका माश्याने दुसऱ्या माशाची शिकार करणं हे त्या नोझी डॉल्फिनला मान्य होतं, कारण ते नैसर्गिक होतं. जीवचक्राचा एक भाग होतं. पण माणसाचा हा बेजबाबदारपणा मात्र त्याच्या समजुतीच्या आणि सहनशक्तीच्याही बाहेरचा होता. आणि आज काय वाट्टेल ते झालं तरी तो माणसांना त्यांच्या भाषेत समजेल असं उत्तर देणार होता.
नोझी डॉल्फिनला इतर डॉल्फिन्स समजावून सांगत होते, चिडू नकोस म्हणून त्याची समजूत घालत होते, पण समुद्राच्या पाण्यात खोलवर पोहणाऱ्या नोझीने वर बघितलं की तिथे तरंगणारा तो वेफर्सचा पुडा आणि सॉफ्ट ड्रिंकची बाटली त्याला सतत दिसत होती. त्याला माहिती होतं, की जरा वेळाने त्या पिशवीत पाणी भरेल आणि ती बुडेल. पण ती बाटली तशीच तरंगत राहील. मग कोणीतरी पिल्लू मासा त्या बाटलीशी खेळायला जाईल. त्याचे अणकुचीदार दात लागून त्या बाटलीला भोकं पडतील. मग त्यात पाणी भरेल आणि मग ती बाटली बुडेल. पण ते होईपर्यंत त्याला ती सतत दिसत राहिली असती.
हेही वाचा!
पण आपण का ऐकून घ्यायचं हे?' नोझीने चिडून एका मोठ्या डॉल्फिनला विचारलं. 'इतके दिवस, इतकी वर्षं आपण ऐकून घेतोय आणि सहन करतोय. त्याचा काय उपयोग झाला? माणसं अजून जास्त जास्त प्लास्टिक आणि कचरा आपल्या समुद्रात टाकतायत. याला काही अर्थ नाही. आपण आता समुद्रातला माणसांचा सगळा कचरा उचलायचा आणि जमिनीवर नेऊन टाकायचा.' त्याने आजूबाजूला जमलेल्या सगळ्या डॉल्फिन्सकडे बघितलं आणि म्हणाला, 'क्या बोलते डॉल्फिनलोग? करूया का असं?'
आणि त्याच्या आजूबाजूच्या बऱ्याच डॉल्फीन्सनी जोरजोरात शेपट्या हलवून आपला होकार दाखवला. मोठ्या, म्हाताऱ्या डॉल्फिनच्या लक्षात आलं, की डॉल्फिन्स चिडलेले आहेत. आणि एकीकडे त्यालाही हे पटत होतं, की माणसाला एकदा चांगली अद्दल घडवायलाच पाहिजे आहे. तरीपण न राहवून मोठा डॉल्फिन त्या तरुण आणि छोट्या डॉल्फीन्सना म्हणाला,
'माणसाने केलेला कचरा जरूर किनाऱ्यावर नेऊन टाका. पण आपल्यामुळे इतर कोणाचं निष्कारण नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. आपण माणसं नाही, डॉल्फिन्स आहोत हे लक्षात ठेवा.'
छोट्या डॉल्फीन्सनी त्याच्याकडे बघून होकारार्थी मन हलवली आणि ते सगळे एकदम सुसाट वर पोहत निघाले आणि त्यांनी एकदम मोट्ठी उसळी मारली.
सगळ्या डॉल्फीन्सनी एकदम उसळी मारली तेव्हा त्यांच्याकडे कोणीच बघत नव्हतं. पण त्यांनी मारलेल्या उसळीमुळे तनिषाची बोट चांगलीच कलंडली तेव्हा मात्र सगळ्यांनी घाबरून तिकडे बघितलं. आता त्या सगळयांना हवे तेवढे डॉल्फिन्स दिसत होते. पण आपल्या बोटीच्या जवळ येऊन इतक्या जोरजोरात उसळ्या मारणारे २०-२५ डॉल्फिन्स बघून त्यांची भीतीने दातखीळ बसली. आता त्यांना डॉल्फिन्स अगदी जवळून बघता येत होते, आणि त्यांना दिसत होतं की त्यांच्यातला सगळ्यात लहान डॉल्फिनसुद्धा कमीतकमी शंभर किलो वजनाचा असणार. बरं छोट्याश्या बोटीत माणसं दाटीवाटीने बसलेली, त्यांना काही हालचाल करता येईना. आणि समजा हालचाल करता आली असती, तरी ते काय करणार होते? समुद्रकिनारा लांबवर अस्पष्ट दिसत होता आणि हळूहळू त्या उसळ्या मारणाऱ्या डॉल्फीन्सनी बोटाभोवती घेराव घालायला सुरुवात केली होती. मोटारबोट चालवणारा नावाडी पण गोंधळून गेला होता. त्याने डॉल्फीन्सना असं वागतांना कधीच बघितलेलं नव्हतं. पण तो शहाणा होता. त्याच्या एक गोष्ट लक्षात आली होती, की आत्ता बोट सुरु करण्यात काही अर्थ नाही. इतक्या डॉल्फीन्सना ओलांडून आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे तो ओरडून लोकांना शांत र हायला सांगत होता आणि लोक मात्र अजून अजून जवळ येणारे डॉल्फिन्स बघून भीतीने अर्धमेले झाले होते. काय करावं ते कोणालाच सुचत नव्हतं.

Image: freepik
हेही वाचा!
हळूहळू इतर डॉल्फीन्समधून एक जरा छान लांब नाकाचा डॉल्फिन पुढे आला. त्याने तोंडात काहीतरी धरून आणलेलं होतं. तो बोटीच्या अगदी जवळ आला, त्याने एक छोटीशी उसळी मारली आणि डोक्याला हिसका देऊन तोंडातली ती वस्तू बोटीत टाकली, ती बरोब्बर तनिषाच्या पायाशी येऊन पडली. ती तिनेच जरा वेळापूर्वी समुद्रात भिरकावलेली सॉफ्ट ड्रिंकची बाटली होती आणि थोडं पाणी भरलेला, पण मगाशी तिनेच टाकलेला वेफर्सचा पुडा होता. तनिषाने पायाशी पडलेल्या त्या पुड्याकडे, बाटलीकडे आणि बोटीच्या काठाला नाक लावून उभ्या असलेल्या डॉल्फिनकडे बघितलं. मगाशी झालेल्या गोंधळात आईबाबा पण तिच्यापासून जरा लांब होते. आता आपण काय करावं याचा ती विचार करत असतांना त्या डॉल्फिनने तोंड उघडलं आणि तो म्हणाला,
'हा कचरा तू टाकलास ना?'
क्रमश:
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact