माझा अभ्यास कधी करायचा हे मी का नाही ठरवू शकत?

all images : freepik

शाळेतून घरी आल्यावर अभ्यासाला कधी बसायचं ते मी माझ्या मनाशी ठरवलेलं असतं. पण त्याच्या आधीच आई म्हणते की “आता अभ्यासाला बस.” मग मला फार राग येतो. आईचा माझ्यावर विश्वास नाहीये का? - रोहित चव्हाण, सातवी

हाय रोहित, तू जे म्हणतोस ना, तसं तुझ्या वयाच्या खूप मुलांना वाटतं. ते म्हणतात की आम्ही आमच्या मनात वेळ ठरवलेली असते आणि तरीही आई आम्हाला परत परत तेच सांगते. मग काय होतं? एकतर तुम्ही मुलं चिडता किंवा आई चिडते किंवा सगळेच एकदम एकमेकांवर चिडतात, आणि अभ्यास राहतो बाजूलाच! तर असं होऊ नये म्हणून काय करायचं? तर सगळ्यात आधी, तुम्ही तुमच्या मनात जे प्लॅनिंग केलेलं आहे ते आईला सांगायचं.

साधी गोष्ट आहे. तुमच्या मनात तुम्ही प्लॅनिंग केलं आहे हे आईला आपोआप कसं समजेल? तुम्ही जर तिला काही सांगितलंच नाही, तर तिला असंच वाटेल ना, की तुम्ही काहीतरी टाईमपास करताय म्हणून… त्यामुळे तिला शाळेतून आल्या आल्या सांगून टाकायचं, की “मी थोडा वेळ मित्रांबरोबर खेळणार आहे. मग ७ वाजता घरी येऊन हातपाय धुवून ९ पर्यंत अभ्यास करणार आहे. आज आम्हाला दिलेला गृहपाठ तेवढ्या वेळात नक्की होईल.” किंवा तुमचं वेगळं काही प्लॅनिंग असेल तर ते आईला सांगून टाका. तिला जर हे माहिती असेल की तुम्ही आपणहून अभ्यासाला बसणार आहात, तर तीही निश्चिन्त राहील ना.

हेही वाचा!

अभ्यास हा घराघरात भांडणाचा विषय का बरं असतो?

पण तुम्ही जर असं केलंत, तर तुमच्यावर एक जबाबदारी मात्र येते. ती म्हणजे तुम्ही म्हणाल त्या वेळी आणि म्हणाल तो अभ्यास आपणहून पूर्ण केला पाहिजे. तो अभ्यास पूर्ण केल्याचं आईला जाऊन सांगितलंही पाहिजे. तुम्ही जर का सलग एक महिना असे आपणहून अभ्यासाला बसलात तर मग आई कशाला तुम्हाला आठवण करेल? तुमचा अभ्यास पूर्ण होणं ही खरं म्हणजे तुमचीच जबाबदारी असते. ती तुम्हाला समजली तर त्यात आईला आनंदच वाटेल यात काही शंका नाही. 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  : 91120505500
ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact