– डाॅ. श्रुती पानसे

आपला अभ्यास किती झालेला आहे, आपल्याला वर्षभर जे शिकवलं त्याचा आकलन झालं आहे का, याचा जसा विचार आपण पेपर लिहिताना करतो. तसंच जे शिक्षक आपला पेपर तपासणार आहेत, त्यांना आपला पेपर कसा दिसेल, कसा वाटेल? त्यांना आपला पेपर बघून तो पेपर चांगला लिहिला आहे असं वाटेल का? की तो पेपर नीटनेटका नसल्यामुळे, अक्षर चांगलं नसल्यामुळे गचाळ वाटेल, याचाही आपण थोडासा का होईना विचार करायलाच हवा.
त्यासाठी आपला पेपर सुबक, सुंदर हवा. आपलं अक्षर प्रमाणात हवं, जे खूप लहान नको, आणि खूप मोठं नको. त्याचप्रमाणे खाडाखोड हा ही मुद्दा आहे.
एखादं वाक्य लिहून झाल्यानंतर असं वाटलं की या उत्तरात हा शब्द इथे नको होता, इथे दुसरा शब्द हवा होता असं म्हणून आपण जर तिथे खाडाखोड केली आणि पुन्हा ते वाक्य लिहिलं. दर चार-पाच वाक्य झाल्यानंतर असाच आपला गोंधळ होत असेल आणि म्हणून खाडाखोड होतं असेल. शब्दांची खाडाखोड, वाक्यांची, आकृत्यांमध्ये खाडाखोड, गणितातल्या पायऱ्या लिहिताना खाडाखोड, सूत्र, समीकरणं, व्याख्या लिहिताना खाडाखोड - अशा प्रत्येक ठिकाणी जर आपली खडाखोड होत असेल तर साहजिकच आपला पेपर गचाळ दिसणार.
हेही वाचा!
पेपर लिहिताना हात का दुखतो?
आणि इथे फक्त पेपर कसा दिसतो हे मुद्दा नाही, तर तुमची परीक्षेसाठीची तयारी किती आहे हे सुद्धा परीक्षकांच्या लगेच लक्षात येईल. याचं कारण खाडाखोड म्हणजे गोंधळ. संपूर्ण पेपरमध्ये चार-पाच ठिकाणी मिळून जर खोडाखोड झाली असेल तर काही फरक पडत नाही. तेवढी खाडाखोड अगदी नक्कीच चालते.
पण जर सतत खाडाखोड असेल तर परीक्षकांच्या हे लक्षात येतं की मुद्दे मांडण्यात मुद्दे आठवून लिहिण्यामध्ये स्पष्टता नाही. खूप सारा गोंधळ आहे. आपण जे लिहितो आहे ते बरोबर लिहितोय का चूक, हे या विद्यार्थ्याला माहीत नाही असं परीक्षकाला वाटू शकतं. त्यामुळे इतकी खाडाखोड तर अजिबातच नको. संपूर्ण पेपरमध्ये मिळून चार-पाच वेळा झाली असेल तर चालू शकते.
पण जास्त वेळा होत असेल तर विचारांची गती आणि लिहिण्याची गती या संदर्भात थोडं काम करायला हवं आहे. विचारांची गती थोडीशी कमी झाली तर योग्य शब्द सुचतील. योग्य वाक्य सुचतील. उत्तरही बरोबर असतील. त्यामुळे विचार करण्याचा आणि लेखनाचाही सराव करा. थोडा सराव केला तर खाडाखोड टळू शकेल
( लेखिका ‘अक्रोड’ उपक्रमाच्या संचालक आहेत.)
shruti.akrodcourses@gmail.com


