रिफ्रेशिंग – पुदिना सरबत!

स्वयंपाकघरातली लुडबुड

- रागिणी थत्ते.

Image - Google.

नमस्कार छोटे मंडळी - काय सुट्टी कशी घालवताय? घरात नुसता धुमाकूळ ना? आईला खाण्यासाठी उभेवारे लावले आहेत ना - आणि सुट्टीच्या दिवसात असे केले तरच सुट्टी अंगी लागते.( आमच्या लहानपणी आम्ही असेच करायचो)आई पाशी हट्ट तर आपण नेहमीच करतो.एखाददिवशी तुम्हीच अगदी एखादे सरबत आई,आजी घरातील मंडळींना करून दिले तर --- बघा विचार करून  -- मग करूया का घरातील सामनातून सरबत.

तुम्हा सर्वांना पाणीपुरी, भेळ वैगरे आवडतेच आणि या साठी लागणारी चटणी आई घरी करतेच.तर या चटणीतील महत्वाचा घटक पुदिना आणि याचे सरबत आपण करायचे आहे.तुम्ही तर एकदम स्मार्ट जनरेशन आहात त्यामुळे मिक्सर चा वापर करणे तुम्हाला सहज शक्य आहे.  तर आता साहित्य घेऊया - एक छोटी वाटी पुदिना पाने (स्वच्छ धुवून घेणे) अर्धी वाटी चिरलेला गुळ,छोटा आल्याचा तुकडा,लिंबू,काळे मीठ आणि आवश्यकतेनुसार बर्फ.

कृती - पहिल्यांदा तीन ग्लास पाणी घेऊन त्यात गुळ भिजत घाला. मग आले आणि पुदिना मिक्सर मध्ये अगदी बारीक वाटून घ्या. पुदिना  - आल्याचे हे वाटण गाळणीतून गाळून घ्या. आता आपला गुळ पाण्यात विरघळला असेल त्यात आले - पुदिना जे गळून घेतले आहे ते एकत्र करून छान ढवळून घ्या. आता काळे मीठ चवी नुसार घाला (अर्धा चमचा लागते.) आणि दोन चमचे लिंबू रस घाला. सरबत तयार झाले आहे - एकतर ते फ्रीज मध्ये गार करून प्या किंवा बर्फाचे क्युब्ज घालून घ्या. थोडीशी उसाच्या रसाची चव येते. आणि तुम्हाला जर अननस आवडत असेल तर त्याचा दोन ते तीन चमचे रस घातला तर हे सरबत अजून छान लागते. घरात अननस असेल तर आवर्जून करून पहा.

(लेखिका 'मुंबई स्वयंपाकघर' फेसबुक ग्रुपच्या सदस्य आहेत. )