आज काय 'कराल'?
- विनय र. र.

आई घरात येताच हीना म्हणाली - कसला वास येतोय? आईनं विचारलं - चांगला की वाईट? हीना म्हणाली- चांगला - वाईट असं नाही सांगता येत. पण उग्र आणि गोडसर वास येतोय! आई म्हणाली - वास तर बरोबर ओळखलास! कशाचा आहे ओळख.
हीना - आई, तुझ्याकडच्या भाजीच्या पिशवीतून येतोय. आई - हो, बरोबर आहे पण वास कसला आहे? हीनाने डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली - फणसाच्या गऱ्यांचा!! बरोबर ओळखला की नाही? आई - हुश्शार गं माझी बाय! हे घे गरे! खा.
तर मित्र मैत्रिणींनो आपण काय करायचं - असे स्वत:चा खास वास असणारे पदार्थ शोधायचे आणि कागदाच्या पुडीत बांधून ठेवायचे. मी काही पदार्थांची नावे सांगणार त्यातले वास असणारे आणि कागदाच्या पुडीत बांधून ठेवता येतील असे पदार्थ निवडा.
काही पदार्थांना वास नसेल किंवा वास असला तरी कागदाच्या पुडीत बांधता येणार नाहीत असे पदार्थ वगळा... कांदा, लसूण, लवंग, वेलदोडे, साखर, मीठ, रॉकेल, हिंग, हळद, तिखट, चहा, कॉफी, गुलाब, मोगरा, चाफा, बकूळ, आंबा, फणस, खरबूज, पेरू, कापूर, ऊद, फिनाईल, व्हिक्स व्हेपोरब, पुदीना देतेवेळी तुळस, दवणा, इत्यादी इत्यादी. अशा किती पुड्या करून ठेवाल? पन्नास ? पुड्यांवर क्रमांक घाला आणि किती क्रमांकाच्या पुडीत काय आहे ते लिहून ठेवा. तो कागद गुप्त जागी ठेवा.आपल्या मित्रमैत्रिणी जमल्या की वास ओळखायचा खेळ खेळायचा. वास ओळखला की एक गुण! बघू कोणाची वास घेण्याची क्षमता तीव्र आहे? वास तीव्र, मंद, आंबूस, उग्र, गोडसर, कडू, आल्हाददायक, असू शकतो. सरावाने वास ओळखण्याची क्षमता वाढवता येते.
आपल्या रोजच्या जीवनात वास घेण्याच्या क्षमतेचा खूप उपयोग होतो. अन्नाचा सुवास आला की तोंडाला लाळ सुटते. तिच्यामुळे अन्नाचा स्वाद समजून घ्यायला आणि अन्न पचायला मदत होते. सुवासामुळे मन प्रसन्न होते. आपली संवेदना वाढते. निरीक्षण शक्ती सुधारते. आत्मविश्वास उभारतो. खराब वास आला की धोक्याचा इशारा लक्षात येतो. तर सुरक्षित जागी जावेसे वाटते. उत्तम वास येणाऱ्यांना खाद्यपदार्थ, परफ्यूम, वैद्यकीय क्षेत्रात आपला व्यवसाय चांगला करता येतो.


