वाचा देनिसच्या गोष्टी.आठ दहा वर्षांच्या मुलाच्या जगातल्या गंमतीजमती!

काय वाचाल?

- मेघना भुस्कुटे

Image: archive.org

'देनिसच्या गोष्टी' हे मूळचं रशियन भाषेतलं, व्हिक्तर द्रागून्स्की यांनी लिहिलेलं पुस्तक. भारत आणि रशिया मैत्रीच्या काळात अनिल हवालदार यांनी प्रथम मराठीत आणलेलं. रादुगा प्रकाशनानं काढलेल्या त्या पुस्तकाची पुठ्ठाबांधणी, पिवळसर जाड कागद, शैलीदार देखणी-रंगीत चित्रं या सगळ्यांमुळे त्या पुस्तकाला काही औरच व्यक्तिमत्त्व लाभलं होतं.
पुस्तकाचा नायक देनिस हा त्याच्या मध्यमवर्गीय आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. आठ-दहा वर्षांचा. त्याच्या नजरेतून सांगितलेल्या या गोष्टी. म्हटलं तर गोष्टी, म्हटलं तर त्याचे अनुभव. ते अनुभव रशियन मुलाचे आहेत हे खरंच. पण जगातल्या कुठल्याही आधुनिक शहरी मुलाला ते लागू पडतातच.

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी आईच्या आठवणीनं उदास होणं काय, किंवा शाळेत फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धेसाठी वेगळं काहीतरी करण्याच्या प्रयत्नातली फजिती काय. अजिबात न आवडणारी कांजी खावी लागू नये म्हणून केलेल्या क्लृप्त्या काय, आणि नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडणाऱ्या नातेवाइकांना तोंड देताना होणारी चिडचिड काय… या सगळ्या गोष्टी जगातल्या कुठल्याही मुलांना आपल्या वाटाव्यात अशाच आहेत. पण त्यातल्या फजित्या, तारांबळी, आणि अपघात यांनी त्यात खेळकर विनोदाचे धमाल रंग भरले आहेत.

हेही वाचा! 

नऊ वर्षांची गोपू आपल्या गावातल्या कोणत्या रहस्याचा शोध घेते?

त्यातली दुसरी गंमत म्हणजे, सगळ्याच गोष्टी पारंपरिक गोष्टींसारख्या आहेत असं नाही. काही गोष्टींमध्ये निव्वळ देनिसला आवडणाऱ्या गोष्टींची यादी आहे. काहींमध्ये एखादा चटका लावून जाणारा, धडा शिकवून जाणारा अनुभव. काहींमध्ये नुसताच संध्याकाळचा हळवा मूड, तर काहींमध्ये प्रसन्न सर्कशीच्या खेळासारखा रंगीत मूड.
मध्यंतरी दुर्मीळ होऊन बसलेलं हे पुस्तक आता लोकवाङ्मयगृह प्रकाशनानं पुन्हा बाजारात आणलं आहे. पण या नव्या आवृत्तीची बांधणी साधीच, कागदी आहे. पण म्हणून काय झालं! देनिस तो देनिसच! हे पुस्तक नक्की वाचा!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact