पाॅपकाॅर्नला सटरफटर खाऊ म्हणता? त्याची ताकद माहिती आहे का ?

 Image: .sunsetworldresorts

तेजस आईबाबांसोबत सिनेमा पाहायला मल्टिप्लेक्समध्ये गेला. सिनेमा पाहून घरी आल्यावर आजीने कौतुकाने तेजसला विचारले, 'मग काय आवडलं तेजला सिनेमात?' तेजसने क्षणाचाही वेळ न घालवता इंटरव्हल आवडला असं सांगितलं. अरे इंटरव्हल कसा आवडू शकतो तुला? असं आजीने विचारल्यावर तेजस म्हणाला, ' कारण बाबाने मला पाॅपकाॅर्न घेवून दिलेत ना इंटरव्हला!' आजीला तेजसच्या उत्तरावर हसूच फुटलं. पण तेजससारखे इतर मुलंही आई बाबांसोबत सिनेमा पाहायला जातात तेव्हा सिनेमापेक्षा त्यांना पाॅपकाॅर्नच तर हवे असतात. अनेकजण तर पाॅपकाॅर्नच्या बोलीवरच आई बाबांसोबत त्यांना न आवडणारा सिनेमा पाहायलाही जातात.  आधी आई बाबा नाही म्हटले तरी सिनेमाच्या इंटरव्हलमध्ये आपला पडलेला चेहरा बघून तेच स्वत:हून पाॅपकाॅर्न घेऊन देतात. वर काय हे भुसकट खायचं? असं म्हणून आपल्यावर रागेही भरतात. पण तरीही आपली गाडी खूश असते, कारण आपल्या हातात पाॅपकाॅर्नची बकेट आलेली असते ना!

पाॅपकाॅर्न म्हणजे काय खाऊ असतो का? असं मोठे कितीही म्हणत असले तरी पाॅपकाॅर्नसारखा दुसरा  खाऊ नाही. ज्याला आपण खाऊ म्हणतो तो एकेकाळी सकाली नाश्त्याला पौष्टिक पदार्थ म्हणून खाल्ला जायचा.  हे कसं? या प्रश्नाचं उत्तर पाॅपकाॅर्नच्या इतिहासात आहे.

हेही वाचा!

पाॅपकाॅर्नचाही इतिहास ?

पाॅपकाॅर्न हा काही माॅडर्न खाऊ नाही. चांगला जुना खाऊ आहे हा. किती जुना तर ५००० वर्षांपूर्वीचा.  पाॅपकाॅर्नचा शोध लागला तो न्यू मेक्सिकोमधील गुहेमध्ये. वॅमपानोग या अमेरिकेतल्या मूळ  जमातीने थॅंक्सगिव्हिंगच्या कार्यक्रमानिमित्त मॅसॅच्युसेट्समध्ये पाॅपकाॅर्न आणले. ही लोकं तेव्हा सुके मसाले, मिरची टाकून पाॅपकाॅर्न तयार करायचे. सूपमध्येही पाॅपकाॅर्न वापरलं जायचं. हळूहळू पाॅपकाॅर्नची ओळख संपूर्ण अमेरिकेला झाली. वसाहतवादी जेव्हा युरोपातून उत्तर अमेरिकेत आले तेव्हा पाॅपकाॅर्न सकाळी नाश्त्याला दूध आणि साखरेसोबत खाल्ले जायचे. युरोप अमेरिकेत पोहोचलेले पाॅपकाॅर्न आपल्याकडे यायला बराच काळ जावा लागला.

पाॅपकाॅर्न मेकिंग मशीन आलं आणि

१८९३ साली चार्ल्स क्रेटर यांनी 'वर्ल्डस कोलंबियन एक्सपोजिशन' या प्रदर्शनात पाॅपकाॅर्न मेकिंग मशीनची ओळख जगाला करुन दिली. या मशीनमुळे पुढे अनेकांना रोजगार मिळाले. पाॅपकाॅर्न तयार करुन विकणे ही व्यवसायाची नवीन कल्पना जगाला मिळाली. हळूहळू हे पाॅपकाॅर्न जगभरात मिळू लागले.

Image: freepik

सिनेमागृहात पाॅपकाॅर्नने प्रवेश केला तो १९१२ मध्ये. आधी तर सिनेमागृहाच्या मालकांना हे पाॅपकाॅर्न म्हणजे व्हीलनच वाटले. लोकांचं लक्ष पाॅपकाॅर्नमुळे विचलित होईल, तेव्हा सिनेमा पाहताना पाॅपकाॅर्न नको अशी त्यांनी भूमिका घेतली. पण काही वर्षांतच सिनेमा जो व्यवसाय करतो त्यात पाॅपकाॅर्नला मिळालेल्या महसूलाचा वाटा मोठा आहे. हे समजल्यानंतर सिनेमागृहाच्या मालकांनी सिनेमादरम्यान पाॅपकाॅर्न विकंण्यास परवानगी दिली. आणि आता तर काय सिनेमा आणि पाॅपकाॅर्नची घट्ट गट्टीच जमलीये.

जगात सर्वत्रच पाॅपकाॅर्न आवडीने खाल्ले जात असले तरी अमेरिकेत सर्वात जास्त पाॅपकार्न खाल्ले जातात. तर नेब्रास्का हे अमेरिकेतील एक मोठं राज्य. या राज्याची अर्थव्यवस्था पाॅपकाॅर्नवर चालते. नेब्रास्कामध्ये दर वर्षी कोट्यावधी रुपयांच्या पाॅपकाॅर्नची निर्मिती होते.  

पाॅपकाॅर्नचा जगभरात पसरलेला पसारा बघता आता कोण पाॅपकाॅर्नला सटर फटर खाऊ म्हणेल बरं?

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा  :  ९११२०५०५००

ईमेल पाठवा  : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact