सुटीत बोअर होण्याला तुम्हाला परवानगी नाही! मजा करा,भरपूर खेळा!

- अभिजित निंबाळकर

Image: freepik

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अरे मी कोण म्हणून काय विचारता? मी तुमचा सवंगडी. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचा फ्रेण्ड. तुम्हा सर्वांना शाळेला सुट्टी पडलीये मग आता काय मज्जाच मज्जा. शाळेत जायचं टेन्शन नाही की अभ्यासाचं बर्डन नाही. फुलं टाईमपास.. हो ना?

पण अरे हे काय सांगतांय? मोबाइलवरील तेच ते गेम्स, टीव्ही वरील नेहेमीचेच कार्टून आणि कंटाळवाणी दुपार या सर्वांमुळे सुटी बोअर चाललीये तुमची? कंटाळा आलाय तुम्हाला? हे काय आत्ताच सुट्या लागल्या आणि लगेच बोअरही व्हायला लागलंय तुम्हाला? छ्या.. हे काही बरोबर नाही!

हेही वाचा!

तुम्हाला माहितीये , मी माझ्या बालपणी सुटीत खूप मज्जा करायचो. मी एका छोट्या शहरात राहायचो, त्यामुळे माझं आयुष्य साधारण मुलांप्रमाणेच एका छोट्या शहरात गेलं. माझ्या बालपणीच्या खूप गमती-जमती, आठवणी आणि किस्से मी जपून ठेवलेत. आजही बालपणी केलेल्या गमती जमतीची आठवण आली की चेहऱ्यावर हसू येतं.

लहानपणी मी आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी मिळून आम्ही खूप धम्माल करायचो. मी घरामध्ये सर्वात लहान असल्यामुळे आजोबा आजी, बाबा आई, काका काकी, मामा मामी सर्वजण माझे खूप लाड करायचे त्यामुळे माझं बालपण अगदी आनंदात गेलं.

मामाच्या गावाला गेलो की शेतात जावून मस्तपैकी ओढ्याचं ताजं ताजं पाणी पिणं, विहिरीमध्ये मनसोक्त पोहणं, आंब्याच्या झाडावर चढून मस्त गोड गोड आंबे झाडाच्या सावलीत बसून पोटभर खाणं, दिवसभर जांभळं, करवंदं आणि चिंचा यांचा रतीब चालूच असायचा.  

Image:freepik

उन्हाळ्यातल्या सुट्यात खरी मजा होती, ती खेळण्याची. आम्ही मित्र मैत्रिणी रोज नव नवीन खेळ खेळायचो. हे खेळ मनमोकळे बागडायला लावणारे, मनमुराद हसवणारे होते. भन्न्नाट खेळ खेळायचो आम्ही. या खेळांसाठी आम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागत नव्हते. ना कोणती महागडी सामग्री खरेदी करावी लागत होती, फक्त आम्ही २-४ सवंगडी जमलो की खेळाची सुरुवात व्हायची.  

गावातील सर्व मित्र मैत्रिणी आम्ही एकत्र येवून विटी दांडू,लगोरी,भोवरा फिरवणे,कंचे,लपंडाव,आईचं पत्र हरवलं,विष अमृत,डब्बा ऐसपैस,काचा कवड्या,चिठ्यांचा खेळ,दगड का माती, बादलीत पाणी पाण्यात भांडे भांड्यात नाणे,डोंगर काय पाणी,आंधळी कोशिंबीर.. असे मजेशीर आणि धम्माल खेळ खेळायचो. खेळता खेळता दिवस कधी मावळायचा आणि संध्याकाळ कधी व्हायची याचं भानच राहात नव्हतं.

संध्याकाळी भूक लागल्यानंतर गरम गरम चुलीवरील भाकरी आणि शेतातील ताजी पालेभाजी खाण्याची मज्जा आणि चवच न्यारी होती. मग रात्री झोपताना आजी जवळ बसवून छान छान गोष्टी सांगायची त्या गोष्टी ऐकत कधी झोप लागायची हे समजायचंही नाही. अशा या आनंदी दिवसांमुळे आमची उन्हाळी सुट्टी छानपैकी नकळत संपून जायची.

उन्हाळ्याची सुटी लागलीये आणि घरात नुसतं बोअर होतंय, असे दिवस माझ्या वाट्याला कधी आलेच नाही. ते तुमच्याही वाट्याला येवू नयेत असं मला मनापासून वाटतं.

( लेखक 'ब्लाॅगर आहेत.)

abhijeetn07@gmail.com

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact