विटी दांडू सारखा एक धम्मला खेळ म्हणजे लगोरी. पण तो खेळायचा कसा?

– अभिजित निंबाळकर

Image: dsource

मित्रांनो, विटी दांडू हा खेळ खेळून मज्जा आली असेल ना. आम्ही विटी दांडू हा खेळ जसे खेळायचो त्याचप्रमाणे आणखी एक धम्माल खेळ खेळायचो. हा खेळ म्हणजे 'लगोरी'. लगोरी हा खेळसुद्धा खूप जुना आणि अस्सल तांबड्या मातीतील खेळ आहे जो खूप पूर्वीपासून खेळला जातो. महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण भारतात हा खेळ खेळला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी या खेळाला वेगळा शब्द आहे. महाराष्ट्र, कर्नाटकातला लगोरी हा खेळ गुजरातमध्ये सतोडियू , हरयाणा, पंजाब, चंदीगढ आणि बिहारमध्ये पिट्टो तर तेलंगणामध्ये लिंगोज नावाने ओळखला जातो.  हा खेळ कृष्ण त्याच्या मित्रांसोबत खेळायचा असं भगवदगीतेत सांगितलं आहे. लगोरी या खेळाला पाच हजार वर्ष जुना इतिहास आहे.

लगोरी कशी खेळणार?

आता या खेळामध्ये पण आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे 'ओली सुखी' करून टाॅस करायचो. जो संघ टाॅस जिंकेल तो चेंडू घेवून लगोरी फोडायला तयार व्हायचा. विरुद्ध संघातील खेळाडू छोटा गोल आखून त्यात एकमेकावर असे ७ फरशीचे तुकडे रचून ठेवायचे. आणि त्यांच्यातील एक तिथे चेंडू झेलण्यासाठी उभा राहायचा. आणि बाकीचे सर्व खेळाडू विरुद्ध संघाच्या खेळाडूंच्या मागे उभे राहायचे.

ज्या संघावर राज्य आहे. त्यातील खेळाडू क्रमाक्रमाने यायचे आणि ठराविक अंतरावरून ते रचलेले फरशीचे तुकडे चेंडूने मारून पाडण्याचा प्रयत्न करायचे. प्रत्येक खेळाडूला ३ संधी दिल्या जायच्या. चेंडू जर फरशीला न लागता एक टप्पा पडून क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल गेला तर समोरील संघ बाद. आणि जर चेंडूने फरशीचे तुकडे पडले तर चेंडू मारणाऱ्या संघातील खेळाडू फरशीचे तुकडे पुन्हा रचण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि त्याचवेळी विरुद्ध संघातील खेळाडू त्या तुकडे रचणाऱ्या खेळाडूंना चेंडूने मारण्याचा प्रयत्न करायचे.

 Image: compassion

फरशीचे तुकडे रचण्याच्या आधी जर चेंडू एखाद्या खेळाडूला लागला तर तो संघ बाद. आणि चेंडूचा मार चुकवून जर फरशीचे तुकडे पुन्हा रचले  गेले तर तुकडे रचणारा संघ विजयी ठरायचा. यामध्ये फरशीचे तुकडे रचणारा संघ चेंडूचा मार चुकवून जर फरशीचे तुकडे एकावर एक रचण्यात यशस्वी  झाला तर त्या संघातील सर्व खेळाडू अगदी आनंदान लगोरी, लगोरी असे ओरडतात.  उड्या मारत समोरच्या संघाला चिडवतात.

लगोरीचे प्राथमिक नियम

  • लगोरी पाडणाऱ्या संघाला सीकर आणि दुसऱ्या संघाला हीटर म्हणतात.
  • सीकर संघाने लगोरी फोडली तर हीटर संघ बाॅल घेवून त्यांना आउट करण्याचा प्रयत्न करतात.
  • हीटर संघाचे खेळाडू सीकर टीमच्या खेळाडूंना गुडघ्याच्या खाली बाॅल मारुन आउट करु शकतात.
  • हीटर टीमचे खेळाडू बाॅल घेवून पळून जावू शकत नाही.
  • लगोरी बनवण्याआधी सीकर संघाचे खेळाडू बाद झाले तर हीटर टीम जिंकते.
  • एक महत्वाची गोष्ट म्हणजे सांघिक कौशल्य आणि खेळाडूंमधील समन्वय यावर लगोरी खेळ अवलंबून असतो.

गुण कसे मोजायचे ?

  • इथे प्रत्येक संघाला चेंडूने फरशीचे तुकडे किती प्रयत्नात पडले यानुसार गुण दिले जायचे.
  • तसेच किती वेळात ते पुन्हा रचले यावर गुण ठरायचे.
  • विरुद्ध संघ त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना कशाप्रकारे योजना आखून बाद करतो यावर गुण ठरवले जायचे. 

( लेखक ‘ब्लाॅगर आहेत.)

abhijeetn07@gmail.com

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact