स्वयंपाकघरातली लुडबुड
-स्नेहल बनसोडे शेलुडकर

घरात असलं की सारखी भूक लागल्यासारखं होतं ना. खायला तर हवं असतं पण पोळी भाजी अजिबात नको असते. एक सिक्रेट सांगते, तुमचे आई बाबा, आजी आजोबा छोटे होते ना तेव्हा त्यांना पण पोळी भाजी नकोच वाटायची. हां कधी कधी काॅम्प्रमाइज म्हणून पोळी / भाकरी खावीच लागायची. पण हे रोज नाही हं!
मग काय खायचे ते . कालवलेला चिवडा किंवा लावलेले पोहे ( म्हणजे चुरमुरे / मुरमुरे, डाळे, भाजके शेंगदाणे, तेल तिखट मीठ, मसाला आणि खूपच वेळ असेल तर चिरलेला कांदा - मिरची ), गुळपापडीचा लाडू किंवा वड्या, शेंगदाण्याचा/ राजगिऱ्याचा लाडू, चिक्की, बॉबी / पोंगे, पेरूच्या/ कैरीच्या फोडी तिखटमीठ लावून, केळी, किंवा कधी कधी तर डब्यात हात घालून शेंगदाणे आणि गूळ, नारळ फोडला की नारळ आणि साखर, शेंगदाण्याचा कूट आणि साखर. हा खाऊ करायला दोन मिनिटं सुद्धा लागत नाहीत.
आणि जास्त भूक असेल तर पोळी / भाकरी वर शेंगदाणे चटणी / मसाला तेल - तिखट किंवा तूप आणि साखर / गूळ तूप पसरून त्याचा रोल. फारच ऐश असेल तर पार्लेजी बिस्कीट / खारी / बटर आणि चहा! उन्हाळा वाळवण चालू असेल तर कुरडईचा गरम चिक- तेल तिखट घालून / उडीद पापडाच्या तेलात बुडवलेल्या लाट्या.. मोठी माणसं त्यांच्या लहानपणी असा मस्त आणि वेगवेगळा खाऊ खायची. सुटलं ना तोंडाला पाणी. तर तुम्ही विचारा बरं घरातल्या मोठ्यांना त्यांच्या लहानपणीचा खाऊ आणि एक दिवस तोही खाऊन बघा की!
(लेखक 'मुंबई स्वयंपाकघर' फेसबुक ग्रुपच्या सदस्य आहेत.)


