कर के देखो
- अदिती देवधर
(तुम्हाला आणि तुमच्या छोट्या मित्रमैत्रिणींना पर्यावरणाबद्दल जबाबदार बनवण्यासाठी धडपडणारी एक ताई!)

ही १९९७ मधली गोष्ट आहे. कॅप्टन चार्ल्स मूर आपल्या बोटीने हवाईहून घरी म्हणजे कॅलिफोर्नियाला परत निघाला होता.
नेहमीचा गजबजलेला मार्ग सोडून त्याने शांत, रिकामा समुद्री रस्ता निवडला. त्याच्या बोटीच्या चारही बाजूला फक्त निळाशार समुद्र होता आणि शांतता!
पहिले दोन दिवस सगळं अगदी सुरळीत होतं. तिसऱ्या दिवशी त्याच्या नजरेस काहीतरी पडलं. ते पाण्यावर तरंगणारं एक छोटंसं प्लास्टिकचं झाकण होतं.
'अरे, इथे हा कचरा कसा आला?' कॅप्टन चार्ल्स मूर थोडा चकित झाला. पुढचा प्रवास करत राहिला. त्याची बोट जसजशी पुढे जात राहिली तसतसे त्याला अजून प्लास्टिकचे तुकडे दिसायला लागले. पुढच्या दिवशी अजून तुकडे. त्याच्या पुढच्या दिवशी अजून थोडे… असं करत करत सातव्या दिवशी त्याला जे दिसलं ते बघून त्याला धक्काच बसला.
हेही वाचा!
भरघोस पिकं देणारे सुपर हिरो जेव्हा पृथ्वीलाच जाळतात तेव्हा..
त्याच्या समोर समुद्र नव्हता. प्लास्टिकचंच एक मोठ्ठंच्या मोठ्ठं बेट जणू पसरलेलं होतं.
कॅप्टन चार्ल्स मूरला दिसलेलं तेच बेट पुढे ‘ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ते बेट एवढं मोठं होतं .. म्हणजे किती सांगू? आपलं महाराष्ट्र राज्य आहे ना तर सात महाराष्ट्र त्या बेटावर मावतील एवढं मोठं.
कॅप्टन चार्ल्स मूरच्या मनात मात्र एकच प्रश्न घोळत राहिला.
“एवढा कचरा इथे आला कसा?”
काही वर्षांनी त्याच्या त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तो कचरा कुणी तिथे टाकलेला नव्हता. आपल्या घरांतून, रस्त्यांवरुन, शहरांमधून हळूहळू वाहत तो कचरा समुद्रात पोहोचला होता.
आणि एकदा समुद्रात गेल्यावर? तो तिथे अनेक वर्ष तसाच राहणार हे तर झालंच…

पण थांबा - ही गोष्ट इथे संपत नाही.
ती बदलू शकते आणि त्या बदलाची सुरुवात तुमच्यापासून होऊ शकते.
समस्या कुठलीही असो, लहान सवयी… मोठा बदल घडवून आणू शकतात.
अशा कुठल्या लहान सवयी आपण लावून घेतल्या तर असे मोठे बदल होतील बरं? चला, तुम्ही आणि मी मिळून असे छोटे उपाय शोधूया. तुम्हालाही काही उपाय सुचले तर मला मेल करुन सांगा… मी वाट बघते.
aditi.deodhar@gipe.ac.in
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


