जुने खेळ, नवी गंमत!

मी काय करु?
- गौरी पटवर्धन. 

Image - Google.

मैदानी किंवा बाहेर खेळायच्या खेळांमध्ये असे अनेक खेळ असतात की ते खेळायला कुठलंही साहित्य लागत नाही. खरं म्हणजे तुम्हाला पण असे बरेच खेळ येत असतात. पण ऐनवेळी ते आपल्याला आठवत नाहीत. असे कुठले खेळ आहेत? तर त्यातला पहिला खेळ म्हणजे अर्थातच पकडापकडी. दुसरा खेळ म्हणजे लपाछपी. तिसरा खेळ म्हणजे लंगडी. असा विचार करायला लागल्यावर तुम्हालाही अजून खेळ आठवतील. विषामृत आहे. जोडीची साखळी आहे. चार पाच खांब जवळजवळ असतील तर खांब खांब खेळता येईल. यातल्या खेळांची नावं ठिकठिकाणी वेगळी असू शकतात. म्हणजे विषामृत, कपबशी आणि टोमॅटो हा एकच खेळ आहे.

याशिवाय घरातल्या चिंध्या, जुनी कापडं गोळा करायची आणि ते सगळं एकत्र करून त्याचा बॉल बनवायचा. हा बॉल एकमेकांना मारून आबाधोबी खेळता येते. हाच बॉल वापरून मधलं माकड नावाचा खेळ खेळता येईल.
अगदी फरशीवर खडूने किंवा मातीत काडीने घरं आखून एक चपटा दगड शोधून ठिक्कर / ठिकरी नावाचा खेळ खेळता येईल.

यातले काही खेळ तुम्हाला माहिती असतील. काही खेळ तुमच्या घरातल्या आई, वडील, काका, काकू, आत्या, मावशी, मामा, मामी, आजी, आजोबा या लोकांना माहिती असतील. त्यांना यापेक्षा वेगळे काही खेळही माहिती असतील. त्यांना एकदा विचारून तर बघा. आणि हे सगळं तुमचं खेळून झालं, तर “आता मी काय करू?” असं म्हणून आईच्या डोक्याशी भुणभूण करण्यापेक्षा तुमचे तुम्ही नवीन खेळ बनवा. तुमचे नियम बनवून तुम्हीही नवीन खेळ बनवू शकता. एकदा ट्राय तर करून बघा.