वाचा, विलास मनोहर यांनी लिहिलेलं - नेगल
- मेघना भुस्कुटे

‘नेगल’ हे आदिवासींच्या भाषेतलं बिबट्याचं संबोधन. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदा आमटे भारतातल्या हेमलकसा नावाच्या गावात आदिवासींच्या मदतीसाठी जाऊन राहिले. त्यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात त्यांच्यासह त्यांचे मित्र आणि सहकारी विलास मनोहर हेही होते. घनदाट जंगल आणि वन्य पशुपक्ष्यांचा धोका, वीज किंवा वैद्यकीय मदत यांसारख्या मूलभूत सोयींचाही अभाव, अशिक्षित आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचं आव्हान... अशी सगळी परिस्थिती.
लोकबिरादरीत शाळेचं आणि दवाखान्याचं काम चालू होतं. खाण्यासाठी वन्य प्राण्यांची शिकार करू नये, असं लोकबिरादरी प्रकल्पाचे लोक आदिवासींना सांगत असत. खाण्यासाठी तर पिल्लं अजिबात कामाची नाहीत, मग निदान ती तरी वाचावीत असा प्रयत्न असायचा. त्यामुळेच एक दिवस एका आदिवासी माणसानं बिबट्याची दोन पिल्लं आणून दिली.
लेखक विलास मनोहर आणि प्रकाश आमटे या दोघांनाही प्राण्यांची अतिशय आवड. त्यांनी जीव लावून ती पिल्लं वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांपैकी एक पिल्लू वाचलं. कापसाच्या बोळ्यानं दूध पाजण्यापासून ते औषधपाणी करण्यापर्यंत आणि पुढे त्याच्या अन्नाची सोय व्हावी म्हणून रॉकेलवर चालणारा फ्रीज आणून मटणाची सोय करण्यापर्यंत सगळं काही या दोघांनी त्याच्यासाठी केलं. तो पिल्लू बिबट्या म्हणजेच या पुस्तकाचा नायक – नेगल.
प्राणी सांभाळण्याचा हा छंद खर्चीक होता. त्यात कायदेशीर अडचणीही होत्या. पण हे ताप सांभाळत या मंडळींनी कुत्रे, अजगर, अस्वल, माकडं, साप्, मगर, हरणं, सिंह आणि बिबट्ये सांभाळले. त्यांच्यावर अक्षरशः पोटच्या पोरांसारखं प्रेम केलं. त्यांच्या तब्बेतीची काळजी वाहिली. आपल्या पोटाच्या मुलांनाही त्या प्राण्यांचा लळा लावला. वन्य प्राण्यांच्या निरागस प्रेमाचा आणि माणसाच्या क्रौर्याचा जगावेगळा अनुभव घेतला. या सगळ्या प्रवासाची सचित्र आणि हृद्य गोष्ट ‘नेगल’ हे विलास मनोहर लिखित पुस्तक सांगतं.


