कागदाच्या घड्यांमधली ताकद शोधणाऱ्या मिल्स वूच्या प्रयोगाची गोष्ट

कागदापासून आतापर्यंत होडी, आकाशकंदील, पतंग, पंख, विमान अशा वेगवेगळ्या वस्तू तुम्ही नक्कीच बनवून पाहिल्या असतील. अनेक मुलांना तर ओरिगामी म्हणजे कागदाची विशिष्ट प्रकारे घडी घालून वेगवेगळे आकार बनवण्याचीही आवड असेल. हे सर्व आपण करतो ते मनाला आनंद मिळ्वण्यासाठी, विरंगुळ्यासाठी. अभ्यासाचा ताण हलका करण्यासाठी. मिल्स वू हा न्यूयाॅर्कमध्ये राहणारा मुलगाही आधी ओरिगामी छंद म्हणून करायचा. सहा वर्ष तो कागदाची घडी घालून विविध आकार तयार करायचा. त्याने कागदाचे प्राणी, पक्षी, किटक तयार केले. तो कागदाची घडी घालून अवघड, क्लिष्ट वाटणारे आकारही सहज करु लागला. त्याच्या या छंदाचं रुपांतर आता 'पॅशन'मध्ये झालंय. आत्ता त्याला आपल्या छंदाचा उपयोग अडचणीत सापडलेल्या माणसांसाठी करायचा आहे. त्यामुळेच आता वू ओरिगामीमध्ये संशोधन करत आहे. कागदाच्या घडीचे वेगवेगळे नमुने तयार करुन त्यावर वजन पेलण्याच्या चाचण्या करत आहे. वूच्या एका संशोधनाने ' अमेरिकेतील थर्मो फिशर सांयटिफिक ज्युनियर इनोव्हेटर्स चॅलेंज' स्पर्धेत परीक्षकांचं मन जिंकलं आणि त्याला या स्पर्धेत २५,००० अमेरिकन डाॅलर्सचं बक्षीस मिळालं. या बक्षिसाचा उपयोग तो आपल्या पुढच्या शिक्षणासाठी करणार आहे.

 

हेही वाचा!

रुबिक्स क्यूब? हा किचकट गेम फक्त ४.२३ सेकंदात कसा सुटू शकतो?

 

आपल्याला येत असलेली ओरिगामी कला कागदापासून प्राणी, पक्षी बनवण्यापुरतीच राहू नये, त्याचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात, इंजिनिअरिंगमध्ये आणि मोठमोठ्या नैसर्गिक आपत्तीत लोकांना मदत करण्यासाठी व्हायला हवा असं त्याला वाटू लागलं. कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात जंगलाला लागलेले वणवे, हेलन चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीत झालेलं नुकसान पाहून ओरिगामीद्वारे आपण अशा परिस्थितीत तातडीने उभारता येतील, वजनाने हलके असणारे, सहज वाहून नेता येणारे निवारे तयार करु शकतो का? असा प्रश्न त्याला पडला आणि त्याने त्यावर उत्तर शोधायला सुरुवात केली.

 

वूने ओरिगामीद्वारे तात्पुरते निवारे तयार करण्यासाठी मिउरा ओरी घडीवर लक्ष केंद्रित केलं. त्याने याद्वारे घडी घालता येतील आणि पसरवताही येतील असे छोटे छोटे नमुने तयार करायला सुरुवात केली. मिउरा ओरी यापध्दतीने घडी घातलेले नमुने त्यांच्या वजनाइतकं वजन पेलू शकता हे त्याला समजल्यानंतर त्याने विविध प्रकारचे कागद वापरुन, त्याच्या विशिष्ट कोनाने घडी घालून, घडीची लांबी, रुंदी याचा अभ्यास करुन त्याने त्यात विविध प्रयोग केले. त्यातून त्याने ५४ मिउरा ओरी माॅडेल्स तयार केले आणि वजनाच्या १०८ टेस्ट केल्या. हळूहळू त्याचा अभ्यास वाढला. त्याचे प्रयोग वाढले. त्याने अचूकतेसाठी गणवेशाचे कापड कापणाऱ्या मशीन्सचा वापर करुन कागद कापले. त्याच्या प्रयोगातून तयार झालेले नमुने त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजन उचलू लागले. वू आपण तयार केलेल्या नमुन्यांवर घरातले वह्या पुस्तकं ठेवू लागला. हळूहळू जीममधील वजनंही तो या नमुन्यांवर ठेवू लागला. मिउरा ओरीच्या घडीच्या वस्तू त्यांच्या वजनाच्या १०,००० पट वजन उचलू शकतात हे दाखवणारे नमुने वूने तयार केले.

मोठमोठ्या स्पर्धेत बक्षीस मिळवल्यानंतर वूला आता नैसर्गिक आपत्तीत तातडीच्या निवाऱ्यासाठी वजनाने हलके पण मजबूत निवारे मिउरा ओरीचा वापर करुन तयार करायचे आहेत. आता वूसाठी ओरिगामी ही केवळ कला राहिलेली नाही. त्याला कागदाच्या घडीत पूर, भूकंप, चक्रीवादळं या नैसर्गिक आपत्तीत घरं गमावलेल्या लोकांसाठी तात्पुरते निवारे उभे करण्याची ताकद दिसत आहे.

 

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact