आफ्रिकेतल्या वाळवंटात राहणारे मीरकट गोंडसही आहेत आणि डेंजरही!

Image: .pbs.org

आफ्रिकेतलं कलहारी वाळवंट हे त्यांचं घर. वाळवंटात् बिळं करुन मीरकट हे प्राणी राहतात. त्यांना एकट्याला राहायला आवडत नाही. ते एकत्र कुटुंबात राहतात. त्यांचं कुटुंबही भलं मोठं असतं. एका कुटुंबात ४०-५० मीरकत असतात. एका कुटुंबातले मीरकट १०-१२ जणांच्या समुहामध्ये वावरत असतात. या मीरकट प्राण्यांच्या भल्या मोठ्या कुटुंबात एक जोडी वरचढ असते. त्यातही मादी मीरकटचा हुकुम चालतो कुटुंबात. बाकी सदस्या गपगुमान या मादी मीरकटचं ऐकतात.

मीरकट म्हणजे मुंगुसाच्या कुळातले. दिसायला गोजिरवाणे म्हणावेत इतके गोड . मागच्या पायांवर उभे राहणारे, अंगावर मऊ बारीक केस असणारे, चिंचोळ्या तोंडाचे मीरकट हे वैशिष्ट्यपूर्ण सस्तन प्राणी आहेत. गोजिरवाणे दिसणारे हे मीरकट प्रसंगी अतिशय हिंस्त्रही होतात. वर्चस्वावरुन एकाच कुटुंबातले मीरकट एकमेकांशी भांडतात. नुसते भांडत नाही तर मारुनही टाकतात.

हे ही वाचा !

अभ्यासकांनी १,०२४ सस्तन प्राण्यांचा, प्रजातींचा अभ्यास केला. त्यात मीरकट सगळ्यात खुनशी प्राणी असल्याचं अभ्यासकांना आढळून आलं आहे. २० टक्के मीरकटांचा मृत्यू हा दुसऱ्या मीरकटाने मारुन टाकल्याने होतो.

एरवी मीरकट म्हणजे समुहात राहणारे, एकमेकांची मदत करणारे प्राणी म्हणून ओळखले जातात. मोठ्या कुटुंबात समुहाने राहणारे मीरकट हे कुटुंबासाठी अन्न शोधण्यात, शिकारी प्राण्यांवर लक्ष ठेवण्यात, कुटुंबातल्या छोट्या मीरकट बाळांची काळजी घेण्यासाठी एकमेकांची मदत करतात.

सकाळी सूर्य उगवला की मीरकटांना बिळाच्या बाहेर पडण्याचे वेध लागतात. पण म्हणून सर्वच्या सर्व मीरकट पटकन बिळाच्या बाहेर येत नाही. आधी कुटुंबातला एखादा मीरकट बिळाच्या बाहेर येतो. जरा उंच ठिकाणी मागच्या दोन पायांवर उभा राहून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतो. समजा मीरकटला काही धोका आढळला तर ते कर्कश ओरडून इतर मीरकटांना सावध करुन बिळातच राहायला सांगतात.

Image: discoverwildlife

Image: newquayzoo

समूहप्रेमी म्हणून ओळखले जाणारे मीरकट हे अतिशय बडबडे प्राणी म्हणूनही ओळखले जातात. मीरकट हे १० प्रकारचे आवाज काढून एकमेकांशी संवाद् साधतात. त्यातही नर मीरकटांपेक्षा मादी मीरकट जास्त बडबड करतात. या मीरकटांची नजर अतिशय तीक्ष्ण असते.  मीरकट जेव्हा बिळाच्या बाहेर असतात, तेव्हा एकाच वेळी त्यांचं लक्ष जमिनीवरील सापांकडे आणि आकाशातल्या गरुडांकडे असतं. साप आणि गरुड हे मीरकटांची शिकार करतात. सापांपासून मीरकटांना धोका असला तरी वेळप्रसंगी ते विषारी साप आणि मुंगूसालाही स्वत:ला इजा होवू न देता मारुन टाकतात आणि खाऊनही टाकतात. किडे, भुंगे, अळ्या, सरपटणारे छोटे प्राणी हे मीरकटांचं मुख्य खाद्य. यासोबतच ते फळ, वनस्पतीही खातात.

हे ही वाचा !

मीरकटांकडे बघितलं की त्यांच्या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं पाहाणाऱ्याचं लक्ष वेधून घेतात. वाळवंटातल्या सूर्याच्या प्रकाशाची तीव्रता डोळ्यांभोवतीच्या काळ्या वर्तुळांमुळे कमी होते. प्रखर उन्हातही  मीरकट  लांबवरच स्प्ष्ट पाहू शकतात. तसेच मीरकटांच्या डोळ्यात एक पडदाही असतो. मीरकट जेव्हा वाळूत बिळ बनवत असतात, तेव्हा वाळू, कचरा डोळ्यात जावू  नये म्हणून डोळ्यातला पडदा मदत करतो.

मीरकटांची झोपण्याची पध्दतही खूप अजब आहे. मीरकटांचं बीळ ६ ते ८ फूट खोल असतं. या बिळात बरेच कप्पे असतात. माणसांच्या घरांना कशा खोल्या (रुम्स) असतात तसे अनेक कप्पे एका बिळात असतात. हे कप्पे झोपण्यासाठी केलेले असतात. पण मीरकट एरवी असे स्वतंत्र झोपत नाही. ते नुसतेच एकमेकांच्या जवळ झोपतात असं नाही तर एकमेकांच्य अंगावर झोपतात. कडक हिवाळ्यात अशा पध्दतीने झोपल्याने त्यांना एकमेकांच्या अंगाची ऊब मिळते. उन्हाळ्यात मात्र मीरकट हे जरा लांब लांब झोपतात.

एकदा बिळ केलं आणि काम झालं असं नाही. बिळं खोदण्यात पटाईत असलेले मीरकट आपलं बिळ विशिष्ट कालावधीनंतर बदलत राहतात.

Image: pinterest

Image: livescience

मीरकट एकत्र कुटुंबात सर्वांसोबत राहात असली तरी त्यांच्यात वर्चस्वाची स्पर्धा असते. कुटुंबातली वरचढ असलेली मादी मरते तेव्हा तिची जागा कुटुंबातली दुसरी मादी घेते. नर मीरकट लहानाचे मोठे होत असताना त्यांनाही वर्चस्व गाजवावंसं वाटतं. मग ते मादी मीरकटला आव्हान देतात. ही वर्चस्वाची स्पर्धा जिंकण्यासाठी मीरकट खाण्यावर भर देतात. जास्तीत जास्त खाऊन जो शरीर कमवेल, इतरांपेक्षा आडदांड होईल  तो कुटुंबावर वर्चस्व गाजवेल. असं असलं तरी या स्पर्धेत मादी मीरकट जिंकतात, हे विशेष!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com 

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?

- साजुली वडनेरे

-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.

आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.

हेही वाचा!

- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.

मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.

- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.

-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact