
Image: windows10spotlight
जंगल म्हटलं की घनदाट झाडी, प्राण्यांची भीती, पक्षी-किटकांचे चित्र विचित्र आवाज. जंगल म्हटलं की पोटात भीतीचा गोळाच येतो. लहानपणी मोठी माणसं ऐकलं नाही की जंगलात सोडण्याची भीती घालायचे. केवळ विचारानेच टेन्शन यायचं या जंगलात आपण हरवलो बिरवलो तर. प्राण्यांनी आपल्याला खावून टाकलं तर. चित्रपट मालिकांमध्येही जंगलं दिसतात, जणू काही ती भीतीचं वातावरण तयार करण्यासाठीच दाखवली जातात की काय असं वाटायला लागतं. जंगलं खरंच एवढी भीतीदायक असतात का? असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर काय सापडतं माहितीये एक ब्यूटीफूल आणि म्युझिकल फाॅरेस्ट. तुमच्या मनातली जंगलाची भीती जावी म्हणून मी काही थाप बिप मारत नाहीये. आपल्या पृथ्वीवर खरंच असं ब्यूटीफूल आणि म्युझिकल फाॅरेस्ट आहे.
हेही वाचा!
हे जंगल आहे जपान देशात. क्योटो या शहराच्या बाहेरील बाजूस 'अरशियामा' नावाचं जंगल आहे. हे जंगल बांबूचं जंगल म्हणूनही ओळखलं जातं. मोठमोठ्या बांबूनी वेढलेल्या या जंगलात चालण्यासाठी सुंदर पायवाटही आहे. या बांबूच्या जंगलात केवळ बांबूच नाहीतर चेरीची देखील झाडं आहेत. चेरीच्या हंगामात हे जंगल आणखीनच रंगबिरंगी आणि सुंदर दिसायला लागतं.
आपल्याला जी जंगलं माहिती आहेत ती दुर्गम भागात, शहराच्या खूप दूर असतात. पण जपानमधं हे जंगल क्योटो शहराच्या अगदीच जवळ आहे. या जंगलात चालण्यासाठी आणि सायकलवर फिरत जंगल बघण्यासाठी चांगला रुंद रस्ता आहे. बाबूंच्या उंचच उंच झाडांच्या पातळ पानांमधून सूर्यप्रकाश रेंगाळत खाली येतो तेव्हा जंगलातून पायी फिरणाऱ्यांना आल्हाददायक अनुभव येतो.
जपानमधील या बांबूच्या जंगलात 'मोसो' नावाची बांबूची प्रजाती आहे. पण या जंगलातला बांबूचं मूळ हे जपानमधील नसून ते चीन आणि तैवानमधील आहे . या जंगलातले बांबू ९२ फूट उंच आहेत. या जंगलाची सैर पायी, सायकलवर तर करता येतेच शिवाय या जंगलातील होझू नदीत बोटमध्ये बसूनही जंगल फिरता येतं. या नदीच्या भोवताली ७ कि.मी लांबीचा रेल्वेमार्गही आहे. त्यामुळे होडीत बसून, रेल्वेने आणि रिक्षेनेही.. अशा विविध प्रकारे या जंगलाची सैर करता येते.

Image: friso.com
हेही वाचा!
म्युझिकल फाॅरेस्ट
जगातलं सगळ्यात सुंदर जंगल म्हणून अरशियामा प्रसिध्द आहे . जगात सर्वात जास्त फोटो याच जंगलाचे घेतले गेले आहेत. या जंगलाच्या नावावरचा हा विक्रमच आहे जणू. पण हे जंगल केवळ डोळ्यांनाच आनंद देतं असं नाही तर आपल्या कानांनाही आनंद देतं. हे जंगल श्रवणीय आहे असं म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल गाणं श्रवणीय असतं, जंगल कुठे श्रवणीय असतं का? पण अरशियामा जंगलाचं हेच तर वैशिष्ट्य आहे की या जंगलातून जाताना कानावर सुंदर संगीत पडतं. हे संगीत कोणी रेकाॅर्डवर प्ले करत नसतं किंवा जंगलाच्या कुठल्या कोपऱ्यात बसून ते कोणी वाजवत नाही तर या जंगलातून वाहणारा वारा आणि बांबू यांच्या सहाय्यानं जो आवाज/ नाद निर्माण होतो. या बांबूच्या जंगलातलं हे नॅचरल म्युझिक ऐकायलाही जगभरातून लोकं येतात. जपानच्या सरकारनं या बांबूच्या जंगलातल्या आवाजाचा समावेश जपानच्या १०० साउण्डस्केपमध्ये केला आहे.

Image: tripzilla
जंगलात जंगल
हे तुम्ही कधी ऐकलं आहे का? पण अरशियामा या बांबूच्या जंगलात आणखी एक जंगल आहे, ते म्हणजे 'किमोनो फाॅरेस्ट'. किमोनो म्हणजे जपानचं पारंपरिक वस्त्र. या किमोनो फाॅरेस्टमध्ये साडे सहा फूट उंचीचे ६०० पोल्स ( खांब) आहेत. या खांबाना रंगबिरंगी किमोनो गुंडाळलेली आहेत. एकाच वेळेस बांबूचं जंगल आणि जपानी पारंपरिक वस्त्रांचं सौंदर्य यांचा एकत्र अनुभव देणारं हे अनोखं जंगल आहे.
भारी आहे ना हे जंगल. अशा ब्यूटीफूल आणि म्युझिकल जंगलात एकदा तरी आपण जायलाच हवं ना!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact