– डॉ. वैशाली देशमुख

जगभरात जवळजवळ २५ ते ३० टक्के मुलं शाळेतल्या दादागिरीला (bullying) बळी पडतात असं दिसून आलंय. अगदी सध्या चिडवाचिडवीपासून ते गंभीर त्रासापर्यंत सगळे प्रकार यात येतात. अनेक मुलांना वाटतं, ‘काय त्यात एव्हढं? आम्ही नुसती गंमत करतो. मजा म्हणून सोडून द्यायचं ना! बुळेपणा करतात झालं! टफ व्हायला पाहिजे.’ मान्य आहे, दरवेळी चिडवणाऱ्या मुला-मुलींचा त्रास देण्याचा हेतू असेलच असं नाही. पण कुणावर त्याचा काय आणि कसा परिणाम होईल हे कसं सांगणार? काही मुलं-मुली नुसते हिरमुसतात, काही निराश होतात, काही जणांना रडू येतं, आत्मविश्वास खचतो. डोकेदुखी, पोटदुखी अशी आजारपणंही होतात. काही मुलांनी शाळा सोडून दिल्याचंही मी पाहिलंय.

शाळेतल्या इतर मुलांच्या त्रासाला तोंड दिलेल्या दोन मुलांची उदाहरणं आठवतायत मला. त्यांना आपण संजू आणि सारा म्हणूया. संजू खूप अभ्यासू होता. त्याला खेळ फारसे आवडायचे नाहीत, तो आपला नेहमी वाचत बसलेला असायचा. त्यामुळे तो कुठल्याच ग्रुपमधे नव्हता. एका टारगट गटानं त्याला त्रास द्यायचं ठरवलं, सहज, मजा म्हणून. त्याची पुस्तकं लपवून ठेव, तो वाचायला लागला की मागे चित्र-विचित्र आवाज काढ असं त्यांनी सुरू केलं. त्याला टोपणनावं ठेवली. तो एकटा पडला. सुरुवातीला त्यानं दुर्लक्ष केलं. पण एकदा कुणीतरी त्याचं एक घाणेरडं कार्टून काढलं आणि शाळेच्या नोटीसबोर्डावर लावलं. संजूचं शाळेत खूप हसं झालं. आता मात्र त्याची सहनशक्ति संपली. तो अचानक शाळेत येईनासा झाला. वर्गाचं रीयुनियन झालं तेव्हा कळलं की त्यावेळी संजू इतका आजारी पडला की त्याला ॲडमिट करायला लागलं. शाळेत पहिला येणारा संजू कसाबसा दहावी पास झाला आणि आता कुठेतरी छोटीशी नोकरी करतो.
हेही वाचा!
सातवीतल्या पूजाला सारखी भीती वाटते? कसली भीती?

साराला लॉकडाउनच्या काळात असाच त्रास झाला, पण ऑनलाइन. सगळ्यांनी ठरवून सोशलमीडियाच्या ग्रुपवर तिला टार्गेट केलं. तिला टोमणे मारले, मुद्दामहून तिचे मेसेजेस कुणीच वाचले नाहीत, तिच्या कुठल्याच मेसेजेसना उत्तरं दिली नाहीत. तिला सोडून एकत्र भेटले आणि फोटो ग्रुपवर टाकले. आधी तिला वाईट वाटलं, मग राग आला त्यांचा. शेवटी तिनं ठरवलं, यांच्यामुळे स्वत:ला का त्रास करून घ्यायचा? ती बाबांशी बोलली आणि सरळ ग्रुपमधून बाहेर पडली. तिचे खेळ, छंद यात तिनं गुंतवून घेतलं
‘चिडवाचिडवी करताना आपल्याला जरी मजा येत असली तरी आपण त्यासाठी त्या दुसऱ्या व्यक्तीचा वापर करतो आहोत का? त्या व्यक्तीला मजा न येता त्रास होतोय का?’ हे प्रश्न स्वत:ला विचारूया, चालेल?
(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)
vrdesh06@gmail.com


