आज काय 'बघाल'?
- अर्चना भट

तुम्ही रोज शाळेत कसे जाता? चालत, धावत की उड्या मारत? बसने की रिक्षाने? बाबाचं बोट पकडून की आईच्या गाडीवरुन? आणि तुम्हाला वेळ किती लागतो? पाच मिनिटं, पंधरा मिनिटं की तासभर? आज आपण जो महितीपट बघणार आहोत ना, त्यातल्या मुलांना शाळेत पोहचायला तब्बल चार दिवस लागतात. हो! ते देखील हवा-पाणी चांगलं असेल तरच. नाहीतर पंधरा दिवसही लागू शकतात.
लडाख मधल्या छोट्याश्या गावात राहणारे डोकार, झेश्मा, मोटूक आणि जॉर्डन, चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्यांच्या गावातल्या छोट्या शाळेत न जाता; लेह मधल्या मोठ्या निवासी शाळेत जातात. आपल्या गावाहून शाळेत पोहचायचा, त्यांचा रस्ता भलताच कठीण आहे. आपल्या घरापासून १०० किमीचा प्रवास, ते पायी पूर्ण करतात. सलग चार दिवस गोठलेल्या नदीवरून, बर्फातून चालत ते प्रवास करतात. दिवसा चालतात आणि रात्री एखाद्या गुहेत मुक्काम करतात. तिथेच अन्न शिजवून खातात आणि स्लीपिंग बॅगमध्ये झोपून जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा चालायला सुरुवात! ह्या प्रवासात त्यांना अनेक अडचणी येतात. कधी बर्फावरून, कधी दगडांवरून तर कधी थंडगार पाण्यातून, चालत ते शाळेत पोहचतात. कसे ते तुम्हाला महितीपट बघून कळेलच. हा महितीपट तुम्हाला युट्यूबवर Free Documentary ह्या चॅनलवर बघता येईल. मोस्ट डेंजरस वेज टू स्कूल नावाची एक मालिकाच आहे. त्यातलाच हा एक भाग. आवडला तर बाकीचे भागही नक्की बघा!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


