उन्हाने होणारी चिडचिड घालवण्यासाठी थंडगार सरबत करा!

स्वयंपाकघरातली लुडबुड

- जान्हवी सावजी शिखरे

Image: frobishers

हुर्रे...चला सुट्टी सुरू झाली,आईबरोबर स्वयंपाकघरात लुडबूड करायची वेळ झाली.
सुट्टी मध्ये दुपारच्या वेळी अगदी बोर होतं ना ? काय करावे आणि काय नको ,असं व्हायला लागतं..आईची पण चिडचिड वाढते. अशावेळी आईसाठी थंडगार सरबत करून आश्चर्यचकित केलं तर!
चला तर मग आज मी तुम्हाला दोन प्रकारची मॉकटेल शिकवते. आई पण खुश होईल आणि तुम्ही पण.
मॉकटेल्स म्हणजे विविध प्रकारची सरबते, ज्यात फळांचे रस, सिरप व इतर चवदार घटक वापरलेले असतात, शिवाय दिसायला पण अतिशय आकर्षक दिसतात.

टमाटिना(टोमॅटो) मॉकटेल- याची रेसिपी खालील प्रमाणे

१. दोन पिकलेले टोमॅटो मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे.
२. त्यात एक पेला पाणी घालून ते पाच मिनिटे उकळून घ्यायचे.
३. गरम असतानाच यामध्ये चवीप्रमाणे साखर मिरेपूड आणि मीठ घालायचं.
४. थंड झाल्यावर बर्फ घालून सगळ्यांनी प्यायला घ्यायचं. काहीतरी वेगळं असं टमाटिना मॉकटेल सगळ्यांना आवडेल.

स्ट्रॉबेरी मॉकटेल

१.ग्लासमध्ये ५-६ पुदिन्याची पाने,अर्धा लिंबूचा रस,एक कप स्ट्रॉबेरीचे तुकडे, दोन चमचे मध घालून लाटण्याने कुस्करून घ्यावे.
२.वरुन बर्फ व स्प्राईट घालून सर्व्ह करावे.फारच सुंदर लागते हे स्ट्रॉबेरीचे मॉकटेल.
वरील दोन्ही मॉकटेल्स चविष्ट, पौष्टिक आणि उत्साहवर्धक आहेत.
गॅस,चाकू व मिक्सर वापरताना आईची मदत घ्यावी.सजावटीसाठी ग्लासच्या कडा लिंबू रसात बुडवून तिखट मीठ/चाट मसाला/साखरेत घोळवावे.जे मॉकटेल आहे,त्या फळाच्या चकत्या करून ग्लासमध्ये अडकवाव्यात.