काय वाचाल?
-अश्विनी बर्वे

तुम्हाला जशा पऱ्यांच्या,राक्षसाच्या,मारामारीच्या गोष्टी आवडत असतील तशा आकाशातील ग्रह, तारे,तिथे होणारे बदल याबद्दल पण वाचायला आवडत असेल,असे वाटते. गच्चीत झोपल्यावर आकाशाकडे बघतांना किती मजा येते आणि तेव्हाच एखादी उल्का पडली तर आणखीन कुतूहल वाटतं. हो की नाही. आपल्याला जसे कुतूहल वाटते तसे कुतूहल एका धूमकेतूला वाटत होते. त्याचे नाव आहे ‘ईसॉन’(आयसन ). याबद्दलची गोष्ट लिहली आहे इदरीस सिद्दीकी यांनी.
हा धूमकेतू बर्फ आणि धुळीपासून बनलेला आहे. आणि त्याला एक दिवस आपली जागा सोडून लांब सूर्याजवळ जाण्याची इच्छा होते. मग तो आपल्या आसपासच्या ग्रहांचा डोळा चुकवून लांबवर निघून जातो. जातांना त्याला कशा अडचणी येतात. त्याचे मित्र त्याच्याबद्दल काय बोलतात. त्याचा वेग किती असतो? हे सगळे लेखकाने फार सुंदर लिहले आहे. त्यात आपणपण त्या धूमकेतू बरोबर प्रवास करू लागतो. आपल्या मनात पण असे कुठेतरी जायचं असतं आणि आईबाबांना काहीतरी चांगलं करून दाखवायची इच्छा असते. तसेच त्यालाही वाटे की एकाच जागी कशाला राहायचे. म्हणून तो बाहेर पडतो. त्याचे मित्र त्याला ‘ठार वेडा’ म्हणतात. तो काहीपण करू शकेल असे त्यांना वाटते. पण त्याच्या एका मित्राला वाटते तो किती छोटा आहे. तो एवढा सगळा प्रवास कसा करू शकेल?
पण आयसनला अमर व्हायचे असते. लोकांनी त्याचा प्रवास लक्षात ठेवावा असे त्याला वाटते. त्याच्या पाठीवर असलेले बर्फाचे आणि धुळीचे ओझे त्याला जड होऊ लागते. तेव्हा काय होते? हे तुम्ही पुस्तकातच वाचा. या पुस्तकात खूप सुंदर चित्रे काढलेली आहेत. ती चित्रं बघतांना आपल्याला आयसन च्या धाडसाचे कौतुक वाटते. एक वैज्ञानिक गोष्ट यात आपल्याला वाचायला मिळते. पण आपण ती वाचतांना अजिबात कंटाळत नाही.


