- राजीव तांबे

परीक्षा संपली की उन्हाळा सुरू होतो. उन्हाळा सुरु झाला की दोन जाहिराती सगळीकडे दिसू लागतात, एक घामोळं झालं असेल तर कुठली पावडर वापरा आणि आमच्याच शिबिराला तुमच्या मुलांना पाठवा. पावडरचं मला माहित नाही पण शिबिराच्या जाहिराती पाहून पालकांनी आणि मुलांनी लगेच निर्णय घेऊ नये असं मी सुचवीन. घोड्यावरुन रपेट, पोहणे आणि अशा 13 गोष्टींची यादी असणाऱ्या एका शिबिराला मी माझ्या मुलीला पाठवलं होतं. पण तिथे मुलांची संख्या जास्त आणि घोडा मात्र एकच असल्याने आयोजकांनी मुलांना घोड्यावर बसवलं आणि घोड्याला कळण्याच्या आतच त्यांना खाली उतरवलं. झाली घोड्यावरची रपेट. मग एका मोठ्या तरणतलावात सर्व मुलांना बुचकळून काढलं. झालं स्विमींग! म्हणून शिबिरातील सर्व घटकांची आधी नीट चौकशी करुन, मुलांनी आणि आई बाबांनी एकमेकांशी बोलून मगच शिबिराचा विचार करावा. ‘पाहिली जाहिरात, घेतला प्रवेश’ असं करू नये. शिबीरं अनेकांना आवडतात. तर काहींना नकोशी वाटतात. खरंतर शिबिरांबद्दलच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली तर शिबिरांबद्दल निर्णय घेणं मुलांना आणि त्यांच्या आई बाबांना नक्कीच सोपं जाईल.
हेही वाचा!
बोअर झालं की काय करायचं याचं उत्तर कोण देणार?
सुट्टीत शिबीराला जायलाच हवं का?
- इतकी मोठी सुटी इतक्या लहान वयातच असते. इयत्ता नववी नंतर अशी मोठी सुटी पुन्हा कधीही मिळत नाही. म्हणून अशा उपयुक्त सुटीचं योग्य नियोजन आधीपासूनच करायला हवं. कुठल्या शिबिराला जायचं हे पालक आणि मुलं असं दोघांनी मिळून ठरवायचं आहे. कारण शिबिरात का जायचं? आणि तिथे काय करायचं? याची स्पष्टता दोघानांही हवी.
- शाळा सुरू असताना जे जे करता येत नाही ते ते करण्यासाठी ही सुटी असते. शालाबाह्य नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सुटी असते. खेळता खेळता न कळत शिकण्यासाठी असते. आणि मुख्य म्हणजे, स्वत:हून शिकण्यातला आनंद आणि आनंदानं शिकण्यातली गंमत कळण्यासाठी ही एवठी मोठी सुटी असते. शिबिरात जायचं ते याचसाठी. स्वत:हून शिकण्याच्या पध्दती विकसित करण्यासाठी. विनोबा म्हणतात, ‘आपण गुणचुंबक व्हायला पाहिजे. दुसऱ्यातले चांगले गुण आपण घेतले पाहिजे.’ आपला गुणचुंबक शक्तीशाली करण्यासाठी शिबिराचा खूप उपयोग होतो.
- शाळेत आपण नेहमीच मित्रांच्या घोळक्यात असतो. आजूबाजूला नेहमी ओळखीचीच माणसं असतात. पण शिबिरात मात्र तसं नाही. शिबिरात नवीन जागा, नवीन मित्र, नवीन खेळ, नव्या गमती जमती असतात. या साऱ्यांशी आपल्याला नव्यानं जुळवून घेताना आपला गुणचुंबक तयार असला की सारं सोपं होऊन जातं. नवीन मित्र जोडणं, त्यांच्यासोबत नवीनच खेळ खेळणं, नव्या जागेत राहाणं हा अनुभव शिबिरातूनच मिळतो. घरी असताना जे सहजी शिकता येणार नाही ते तुम्ही शिबिरात गेल्यावर नकळत शिकतात. या अनुभावाचा तुम्हाला आयुष्यभर उपयोग होतो. कारण बदलणाऱ्या परिस्थितीशी पटकन कसं जुळवून घ्यायचं याची रंगीत तालीम तुमची शिबिरात पूर्ण होते.

Image: telegraphindia
शिबिरात जाऊन मी काय करणार?
काही मुलांना वाटतं, ‘ शिबिरात आपलं कुणी ओळखीचं नसेल तर मग आपण जाऊन काय करणार? आपलं कसं होणार? मला जमेल का? त्यापेक्षा घरीच राहू.’ सगळ्यात आधी हा विचार डोक्यातून काढा. ‘नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय पोहता येत नाही, धडपडल्याशिवाय सायकल शिकता येत नाही आणि शिबिराला गेल्याशिवाय आपल्याला आपल्यातील ताकद ओळखता येत नाही. शिबिरात गेलं की, वेगळ्या मुलांत मिसळलं की, रोज वेगळंच जेवण जेवलं की, जेवल्यावर आपणच आपलं ताट स्वच्छं धुवायचं असलं की, आई वडिलांपासून थोडं लांब गेलं की.. आपल्याला आपलीच नव्यानं ओळख होते हे लक्षात ठेवा.
शिबिरातून परत आलेली मुलं लगेच ओळखता येतात. कारण त्यांचा वाढलेला आत्मविश्वास त्यांच्या वागण्यातून दिसू लागतो.
समजा कुठल्याही शिबिराला जाताच आलं नाही तर..
- त्यांनी अजिबात नाराज व्हायचं नाही. स्वत:तील सूप्त शक्ती ओळखण्यासाठी, आपला आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी फक्त शिबिरंच उपयोगी पडतं असं अजिबात नाही. शिबिरात न जाणाऱ्या मुलांना तर खूप गोष्टी करता येतील.तुमच्या परिसरात काही दिव्यांग, अंध किंवा कर्णबधिर मुलं राहात असतील. त्यांना तुमच्या मदतीची नाही तर मैत्रीची गरज असते. या सुटीत असे नवे मित्र जोडा. त्यांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवा. त्यांच्यासोबत सापशिडी, पत्ते, उनो असं काही खेळा. गप्पा मारा.
- उन्हाळ्यात कलिंगड, आंबे, जांभळं, पेरू अशी खूप फळं आपण खात असतो. तुमव्या आजूबाजूच्यांना, नातेवाईंकाना आणि मित्रांना सांगा, ‘फळं तुम्ही खा पण बिया मात्र स्वच्छं धुवून मला द्या.’ या बिया जमवा. आणि पावसाळा सुरू झाला की जवळच्या टेकडीवर, डोंगरावर आणि परिसरातल्या बागेत या बिया पेरत जा. काही बिया नक्कीच रुजतील, झाडं उगवतील.
- जांभळं, आंबे, बीट, पुदीना, पालक, हळद, मुळा, कोथिंबीर यापासून छान नैसर्गिक रंग मिळतात. या सुंदर ऑगॅनिक रंगांचा वापर करुन मस्त चित्र रंगवा. असे ‘चविष्ट चित्र’ घरात लावून ठेवा.
- या वर्षी सुटीत पोळी लाटायला आणि कलिंगड कापायला शिका. खूप मजा येते. आत्तापर्यंत तुम्ही न केलेली एखादी गोष्ट स्वत:हून शिकाच. गावातले, शहरातले नवीन रस्ते शोधा. * मित्रांसाठी, नातेवाइकांसाठी सुंदर शुभेच्छापत्र तयार करा.
- आईसोबत एखादा नवीन पर्दाथ करायला शिका आणि सर्वांना खिलवा. मदतीला घरातले सगळे असतातच. पण स्वत:हून शिकण्याची मजा काही औरच! त्यासाठी हे आपलं घरातलं शिबीर काही कमी नाही बरं!
-mulansobat@gmail.com
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


