आज काय 'कराल'?
- विनय र.र.

तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात का? कानाचा वापर करून आपण गाणी ऐकतो. मात्र कधी कधी वरातीत मोठ्या आवाजात डीजे चालू असेल किंवा लाऊड स्पीकरच्या भिंती लावून गाणी लावलेली असतील तर? आवाजाच्या लहरी कानांवर पडतात तशा आपल्या अंगावर सुद्धा पडतात. त्या लहरी आपल्या हृदयाला, अंगाला, त्वचेला जाणवतात. आवाज कानाप्रमाणे त्वचेलासुद्धा जाणवतो. त्यामुळे संगीताचा आनंद आणखी मिळतो. खरं नाही वाटत?
बीथोवेन नावाचा संगीतकार बहिरा होता. पियानोच्या कंपनांचा वापर करून संगीत 'अनुभवत' असे. पियानोच्या पृष्ठभागावर कान लावून किंवा दातांमध्ये लाकडी काठी धरून (जी पियानोला जोडलेली असे) कंपनांद्वारे त्याला स्वर जाणवत असत.
मेंडी नावाची एक गायिका होती. एका आजारपणात तिला दोन्ही कानांनी ऐकण्याची क्षमता पूर्णपणे गमवावी लागली. पण तरीही तिने आपल्या पायांना जाणवणाऱ्या कंपनांद्वारे ताल आणि स्वर अचूकपणे समजून घेत आपले गाणे पुढे चालू ठेवले. आपल्याला हे जमेल? चला प्रयोग करून बघू.
१. यासाठी आपल्याला पार्टनर लागणार. एक किंवा अधिक सुद्धा चालतील.
२. सगळ्यांनी मिळून दहा गाणी थोडी थोडी ऐकायची. मग एकेकाची परीक्षा घ्यायची.
३. परीक्षार्थीचे कान आणि डोळे बंद करायचे. त्याचे दोन्ही हात टेबलवर ठेवायचे.
४. मोबाईलमध्ये दहा पैकी एक गाणं लावायचं. मोबाईल टेबलवर ठेवायचा.
.. बघू कोणा कोणाला स्पर्शाने गाणी ओळखू येतात? काहींना तर गाणी ऐकताना बंद डोळ्यांसमोर चित्रही दिसतात. मजा आहे की नाही?
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


