- डॉ. वैशाली देशमुख
टीव्ही लावा, की मोबाइल वर व्हिडीओ बघा; कुठल्या ना कुठल्या जाहिराती बघितल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. आणि ती एक जाहिरात तर नेहमी असते- पार्टीला जाणारी मुलगी, आरशात बघते तर तोंडावर भला मोठा फोड, पिंपल! झालं, तिचा मूड जातो. ‘असं कसं पार्टीला जायचं? लोक नावं ठेवतील ना! किती कुरूप दिसतंय हे! शी:’ मग कुणीतरी तिला एक जादूचं मलम देतं. ती ते लावते, आणि काय आश्चर्य! पिंपल गायब! चेहरा तुकतुकीत! हसऱ्या चेहऱ्यानं मग ती पार्टीत जाते आणि सगळे तिच्याकडेच बघत राहातात. जाहिरातीत घडणारी क्षणात चेहेऱ्यावरचे पिंपल गायबची जादू प्रत्यक्षात होत नसली तरी जाहिरातीतल्या मुलीला असलेली पिंपलची समस्या मात्र खरी आहे.
तुमच्यावर किंवा तुमच्या मोठ्या भावंडावर कधी ना कधी असा प्रसंग आला असेल. कसले असतात हे फोड? लहानपणी तर नव्हते. मोठ्या माणसांनाही नसतात. मग आपल्यालाच का असा प्रश्न मुलामुलींना पडतोच.
चेहेऱ्यावर पिंपल्स का येतात?
जी संप्रेरकं म्हणजे हार्मोन्स तुमच्यामधे , तुमच्या शरीरामध्ये बदल घडवून आणताहेत, त्यांच्यामुळेच हे फोडही येत आहेत.
आपली त्वचा किंवा कातडी कोरडी पडू नये, मऊ राहावी म्हणून त्यामधे तेलाच्या ग्रंथी असतात. वयात येताना त्यांच्यामधून जरा जास्तच तेल पाझरायला लागतं, हॉर्मोन्सची कृपा, दुसरं काय!
कधी कधी हे अती झालेलं तेल त्या ग्रंथींच्या नळयांमधे अडकतं आणि त्यांना ब्लॉक करून टाकतं. मग येतो तिथे फोड.

Image: freepik

Image: curamedaesthetics
काय करायचं या पिंपल्सचं?
आधी काय करायचं नाही ते बघूया. त्या फोडायच्या नाहीत, टोकरायच्या नाहीत. कुणाच्या तरी सल्ल्यानं किंवा जाहिरातींना भुलून वाट्टेल ती मलमं लावायचे प्रयोग करायचे नाहीत. कारण या सगळ्या गोष्टींमुळे तिथे कायमचे डाग आणि व्रण राहण्याची शक्यता असते. आणि हो, ते आलेत म्हणून तोंड लपवूनही बसायचं नाही. आपल्याला स्वत:ला त्यांचा जितका बागुलबुवा वाटतो ना, ते इतरांच्या गावीही नसतं. फोडांच्या या लाटा काही वर्षं येत-जात राहणार आहेत. काळ लोटेल तशी त्यांची तीव्रता कमी कमी होत जाऊन थांबेल. तोपर्यंत त्यांना सहन करता येईल का, त्यांच्याशी मैत्री करता येईल का?
पाण्यानं तोंड स्वच्छ धुतलं तर त्वचेचा तेलकटपणा काबूत राहील. छोटे फोड असतील तर नुसती वाट पहिली तरी ते जातील. खूप मोठे, खूप प्रमाणात किंवा पू भरलेले फोड असतील तर मात्र सरळ डॉक्टरांना दाखवलेलं बरं.
जेव्हा आपण ताजी फळं, ताज्या भाज्या खातो, तेव्हा त्यात असलेली खास रसायनं आपली त्वचा निरोगी ठेवतात, नवीन येणाऱ्या त्वचेला खतपाणी घालतात. भरपूर खेळतो तेव्हा शरीरात सगळीकडे भरपूर रक्ताभिसरण होतं. त्यामुळे त्वचेमधली छिद्रं स्वच्छ, मोकळी होतात. या दोन्ही गोष्टींमुळे पिंपल्सचं प्रमाण कमी होतं आणि त्या लवकर भरून येतात. हेही विसरायला नको.
(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)
vrdesh06@gmail.com
feature image : illustAC
आजपर्यंत कधीच कुणाला सांगितलेलं नाहीये पण आतून खूप भीती वाटते असं काहीतरी सगळ्याच मुलामुलींच्या मनात साठलेलं असतं. आईबाबांशी बोलायला भीती वाटते, मित्रमैत्रिणीना सांगायला/विचारायला कसंतरीच वाटतं असं जे जे तुमच्या मनात दडवून ठेवलेलं असेल ते ऊर्जाच्या कानात सांगा... तुमचं नाव सिक्रेट ठेवून आपण त्याची उत्तरं शोधूया..
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा :urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact

आईबाबा बघावं तेव्हा हातात फोन घेऊन बसलेले असतात, मी फोन हातात घेतला की मात्र मला बोलतात. त्यांनी फोन बघितलेला चालतो, मग मी का नाही?
- साजुली वडनेरे
-आईबाबा सतत फोन वापरतात म्हणजे त्यावर फक्त टाईमपास करतात असं नाही. हल्ली ऑफिसची बरीचशी कामं ही मोबाइलवरच सुरु असतात. कदाचित घरी असतानाही आईबाबांना मोबाइलवरुन ती कामं करणं आवश्यक असतं. तो त्यांच्या ऑफिसमधल्याच कामाचा भाग असतो. त्यामुळे त्यांना मोबाइल बघण्याची इच्छा नसली तरी त्यांना तो पाहावाच लागतो. या मोबाइलमुळेच हल्ली आई बाबा ऑफिसमधून घरी आले तरी घरी आल्यासारखे वाटतच नाही.
आपल्याशी ते गप्पा मारत असले, खेळत असले किंवा आपण मस्त एकत्र बसून चित्रपट पाहात असलो, जेवत असलो तर मध्येच आई किंवा बाबांना फोन येतात. मग ते कामाचे असले की घ्यावेच लागतात. एवढंच कशाला घरी असताना कामाचे फोन आले की हातातली कामं सोडून आई बाबांना अनेकदा लॅपटाॅप उघडून काम करावं लागतं. यामुळे आपला जसा हिरमोड होतो तसा त्यांचाही होतो. घरी आल्यावर त्यांना आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण कामाला नाही म्हणता येत नाही. हा त्यांचा नाईलाज असतो. त्यामुळे आई बाबा जेव्हा मोबाइल पाहात असतात तेव्हा प्रत्येक वेळी ते टाइमपासच करत असतात असं नाही.
हेही वाचा!
- आई बाबांच्या मोबाइलवर तुझ्या शाळेचा, शिक्षकांचा, तुझ्या मित्र मैत्रिणींच्या पालकांचाही ग्रुप असेल. त्यावर आलेल्या सूचना, माहितीही आईबाबांना बघावी लागत असणारच.
मुलांनी अभ्यास वह्या पुस्तकातूनच करायचा असतो. त्यामुळे विरंगुळा म्हणून थोडावेळ तू मोबाइल बघितलास तर आईबाबा ते समजून घेतात. पण तू जर जास्तच वेळ मोबाइल पाहाण्यात घालवलास तर ते तुला रागावणारच.
- मोबाइल बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करणं, मैदानावर जाऊन मित्रमैत्रिणींसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं हे तुझं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तू ते करावं अशी इच्छा आईबाबांची असते.
-लहान मुलांनी सतत मोबाइल बघितला तर त्याचे त्यांच्या डोळ्यांवर, बुद्धीवर, वाढीवरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे आईबाबा जरी मोबाइल बघत असले तरी आपण मात्र तो कमीच बघावा, त्यातच आपला फायदा आहे.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact