
परीक्षेत मी माझ्या मित्राला उत्तर नाही दाखवले. त्यामुळे तो माझ्यावर रागावला आहे, बोलतही नाही. मी काय करु?
-अक्षत खेडकर, ओंकार विद्यालय, छत्रपती संभाजी नगर
- मित्र अडचणीत असला तर त्याला मदत करणं ही मैत्रीची अटच असते. पण परीक्षा ही काही मित्राची मदत करण्याची जागा नाही आणि वेळही नाही.
- आपल्याला विषय किती समजला, आपल्याला किती येतं हे समजण्यासाठी आपण परीक्षा देत असतो. असं असताना तू जर मित्राला अडलं म्हणून तुझ्या उत्तरपत्रिकेत लिहिलेलं उत्तर त्याला दाखवलं असतं तर त्याचा तेवढ्यापुरती प्रश्न नक्कीच सुटला असता. पण जे येत नाही ते सुधारण्याची गरज त्याच्यात कधीच निर्माण झाली नसती. त्यामुळे तू तुझ्या मित्राला उत्तर दाखवले नाही हे योग्यच केले. किमान त्यामुळे तरी तो त्याला जे येत नाही त्याचा अधिक सराव करण्याचा प्रयत्न करेल.
- मित्राला आलेला राग घालवण्यासाठी तू त्याच्याशी बोलायला हवं. आपण हे असं का केलं, ते करणं तुझ्याच कसं फायद्याचं आहे हे त्याला समजावून सांगायला हवं. शिवाय जी गोष्ट शिकण्यास त्याला अवघड जात आहे ती परीक्षेआधी समजावून देण्यात त्याची मदत तू नक्कीच करु शकतो आणि ती तशी करायलाही हवी. परीक्षेआधीच्या अभ्यासात मित्र मैत्रिणींची मदत लागतेच आणि ती तेव्हा करायचीही असते आणि आपणही घ्यायची असते.
- विषय समजून देणे-घेणे, पुस्तकातील अवघड प्रकरणं, आकृत्या, आलेख याबाबतीत मित्र-मैत्रिणी एकमेकांना मदत करत असतात. मित्र मैत्रिणींमुळे अभ्यास सोपा वाटतो, तो करायला हुरुप येतो. पण परीक्षा खोलीत जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा मित्र मैत्रिणींना कोणत्याही प्रकारची मदत करायचीही नसते आणि त्यांच्याकडून घ्यायचीही नसते. परीक्षेत चुकीच्या पध्दतीने मित्राला मदत करुन किंवा त्यांच्याकडून मदत घेऊन आपण एकप्रकारे शिक्षकांना, आपल्या पालकांना आणि स्वत:ला फसवत असतो. परीक्षेआधी जर तू तुझ्या मित्राची मदत केली तर परीक्षेत उत्तर नाही दाखवलं म्हणून त्याला आलेला राग नक्की पळून जाईल.
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


