आज काय 'कराल'?
- विनय. र.र.

दोन हातांनी एकाच वेळी खूप काही करता येऊ शकते. त्यासाठी दोन्ही हातांमध्ये समन्वय असावा लागतो. अशी कामे सरावाने जमू शकतात. पेटी वाजवताना भाता ओढणे आणि पट्ट्या दाबणे, तबला वाजवताना तबला आणि बग्गा दोन्हींवर बोटे चालवणे. कीबोर्डवर दोन्ही हातांनी वेगवेगळ्या की दाबून जलद टायपिंग करता येणे. बास्केटबॉल ड्रिबल करणे, टेनिसमध्ये रॅकेट किंवा क्रिकेटमध्ये बॅटिंग करताना दोन्ही हातांचा समन्वय ,स्वयंपाक करताना एका हाताने भाज्या परतणे आणि दुसऱ्या हाताने मसाले मिसळणे. अशी अनेक कामे आपण करत असतो. मात्र काही कामे एकाच हाताने करायला भाग पाडले जाते. विशेषत: लिखाणाचे काम शक्यतो उजव्या हातानेच करायला सांगतात. महात्मा गांधी जहाजातून भारतात परतत होते त्यावेळेला त्यांनी आपले आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग लिहायला घेतले. लिहून लिहून उजवा हात थकला की डाव्या हाताने लेखन करत.
काही माणसे तर एकाच वेळेला दोन्ही हातांनी लिहू शकतात. दोन वेगळ्या भाषांमध्ये दोन वेगळ्या गोष्टी करू शकतात. त्यामुळे लिखाण पटापट होते आणि आपल्या मेंदूची ताकदही वाढते. हे काहींना नैसर्गिक वरदान असते. मात्र आपल्याला थोड्या सरावाने दोन्ही हातांनी स्वतंत्रपणे लिहिणे किंवा चित्र काढणे शक्य होते, ज्याला अॅम्बिडेक्स्ट्री म्हणतात. हे तुम्हाला जमवायचं आहे का?
- हे टप्प्याटप्प्याने जमेल. आधी तुमच्या कमजोर हाताने बॉल भिंतीवर विशिष्ट ठिकाणी फेका. ते जमावे की उसळून आलेला बॉल कमजोर हाताने पकडायचा प्रयत्न करा. ते जमले की त्या हाताने ठेका वाजवायचा प्रयत्न करा. आता तुमचा कमजोर हात ताकदवान झाला असेल.
एक कागद घ्या त्याला उभ्याच घडी घाला. दोन्ही हातात दोन पेन्सिली घ्या. डावीकडे डाव्या हाताने आणि उजवीकडे उजव्या हाताने सारखेच शब्द लिहा. जमले की आम्हाला नक्की कळवा!
काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact


