माणसाच्या मनात डोकावून व्हॅन गाॅ कसा चित्र काढायचा?

चला, चित्र काढूया!

- आभा भागवत

Image: lonelyplanet

युरोपातल्या नेदरलंड देशातील अत्यंत नावाजलेल्या व्हॅन गॉ या चित्रकाराचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल. नेदरलंडच्या रहिवाश्यांना 'डच' म्हणतात. व्हॅन गॉ हा डच चित्रकार होता. त्याचं पहिलं नाव व्हिन्सेंट होतं. पण आडनावाने ओळखण्याच्या पद्धतीमुळे सगळं जग त्याला व्हॅन गॉ म्हणतं. १९ व्या शतकातला हा अत्यंत महत्वाचा चित्रकार होता. तो ३७ वर्षांचा असताना त्याने आत्महत्या केली. खरंतर आत्महत्या कोणीच करू नये. व्हॅन गॉ सारखा प्रतिभावान चित्रकार अजून अनेक वर्ष जगला असता तर कितीतरी अप्रतिम चित्रकाम त्याने केलं असतं, असा विचार करून हळहळायला होतं.

व्हॅन गॉने पद्धतशीरपणे चित्रकलेचं शिक्षण घेतलं. चित्रकला शिक्षणात प्रमाणबद्ध चित्रं कशी काढायची, रचना कुठली चांगली दिसते, रंग-रेषा यांचा वापर कसा करायचा, हुबेहूब चित्रं कशी काढायची असा अभ्यास करतात. व्हॅन गॉ जेव्हा हुबेहूब आणि सुंदर चित्रं काढू लागला तेव्हा त्याला त्याच्या पलीकडे जाऊन त्यात वेगवेगळे प्रयोग करावेसे वाटले. पारंपारिक चित्रांप्रमाणे गुळगुळीत रंगलेपन न करता त्याने काही विशिष्ट पोत (टेक्शचर्स) वापरायला सुरुवात केली. समोर दिसणाऱ्या माणसाच्या मनात डोकावून त्याचं आयुष्य चित्रात दाखवता आलं तर ते चित्र जास्त सुंदर होईल असं त्याला वाटलं. त्याने त्याच्या खास अशा शैलीत दोन हजाराहून जास्त चित्रं काढली. या शैलीला पोस्ट-इम्प्रेशनिझम म्हणतात. त्यातली जवळपास पन्नास चित्रं ही स्वतःची आहेत, ज्यांना आपण ‘सेल्फ पोर्ट्रेट’ म्हणतो. रेघा रेघा काढून वेगवेगळ्या रंगांचे ब्रशचे फटकारे मारत व्हॅन गाॅ सारखी चित्रं आपणही काढून पाहू, पुढच्या लेखात.

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?

व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००

ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com

क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact