सुटीत शिक्षकांनी डायरी लिहायला सांगितली, पण लिहू काय त्यात?

 

मराठीच्या शिक्षकांची सगळ्यात आवडती ऍक्टिव्हिटी काय असते? किंवा इंग्लिश शाळेतल्या इंग्लिशच्या शिक्षकांची सगळ्यात आवडती ऍक्टिव्हिटी काय असते?  सुट्टी लागली म्हटल्यावर  सगळ्या शिक्षकांनी सुट्टीत काही ना काहीतरी करायला सांगितलंच असणार. त्यात या इंग्लिश/मराठीच्या शिक्षकांनी तुम्हाला सुट्टीत काय करायला सांगितलं? तर त्यात सगळ्यात जास्त शक्यता दोन गोष्टींची आहे. एक म्हणजे भरपूर पुस्तकं वाचा आणि दुसरं म्हणजे डायरी लिहा. आणि परत शाळा सुरु झाली की ती डायरी आणि वाचलेल्या पुस्तकांची यादी मला दाखवा... हो ना? त्यापैकी पुस्तकं वाचणं आपण जरा बाजूला ठेऊ. आणि डायरी लिहिण्याचा जरा सिरियसली विचार करू. तुमच्यापैकी अनेकांनी डायरी लिहायला सुरुवात केली असेल. चार पाच दिवस ती लिहिली असेल आणि मग कंटाळून सोडून दिली असेल. कारण तुमच्या डायरीतलं प्रत्येक पान सारखंच दिसलं असेल.

 

 

८ वाजता उठलो/उठले

नाश्ता केला

९ वाजता आंघोळ केली

साडेबाराला जेवलो/जेवले

दुपारी पुस्तक वाचलं (म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही टीव्ही बघितलेला असतो किंवा व्हिडीओ गेम खेळलेला असतो पण तसं डायरीत न लिहिण्याइतके तुम्ही शहाणे आहात. म्हणून पुस्तक…)

हेही वाचा!

घरातल्या 'वेस्ट'पासून शक्य ते 'बेस्ट' बनवा. कसा वाटला प्रोजेक्ट?

पाच वाजता अमुक केलं

सात वाजता तमुक केलं 

नऊ वाजता जेवलो/जेवले

अकरा वाजता झोपलो/झोपले 

अरे क्काय… ही काय डायरी आहे का शाळेचं टाईमटेबल??? अशी नसते लिहायची डायरी. डायरीत काय लिहायचं असतं? तर दिवसभर आपल्याला जे काही सुचलेलं असतं, वाटलेलं असतं, पण आपण जे फेसबुकवर टाकू शकत नाही आणि ज्याचा  व्हिडीओ पण बनवू शकत नाही अशा गोष्टी डायरीत लिहायच्या असतात.

म्हणजे काय? तर तुम्हाला एखादी भारी आयडिया सुचली असेल, पण ती इतक्यात कोणाशी शेअर करायची नसेल तर ते डायरीत लिहा. की आज मला कपड्यांना इस्त्री करण्याची भारी आयडिया सापडली. किंवा एखाद्या दिवशी आईचा राग आला असेल तर ते लिहा. घरातलं काम आपणहून केल्याबद्दल कोणी शाब्बासकी दिली असेल ते लिहा. एखादं सुचलेलं चित्र काढा, कविता सुचली तर ती लिहा, गोष्ट सुचली तर ती लिहा, तुम्हाला कोणीतरी व्हावंसं वाटलं तर ते लिहा… आपल्याला जे खरं खरं वाटतं ते लिहा.

आणि ती डायरी कोणाला सापडणार नाही अशी लपवून ठेवायला विसरू नका!

काय वाटलं वाचून ? मजा आली? नवीन काहीतरी कळलं ?प्रश्न पडले?... लग्गेच कळवा! - कसं कळवणार ?
व्हाॅट्सॲप मेसेज करा : ९११२०५०५००
ईमेल पाठवा : urjaa.online@gmail.com
क्लिक करा, मेसेज लिहा :https://urjaa.online/contact